मुंबई : १४ फेबृवारी हा सर्वत्र व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. मात्र जगभरात अशीही काही मुलं आहेत, ज्यांचे हृदय योग्यरित्या आणि सर्वसामान्य यांप्रमाणे कार्य करत नाही. जन्मतःच त्यांना हृदयविकाराचा त्रास असतो. याला जन्मजात हृदय दोष असे म्हणतात. याविषयी लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी १४ फेब्रुवारी रोजी जागतिक जन्मजात हृदय दोष जागरूकता दिवस साजरा केला जातो. ७ ते १४ फेबृवारी दरम्यान पाळण्यात येणाऱ्या जागतिक जन्मजात हृदय दोष जागरूकता सप्ताहानिमित्त बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रनने बालरुग्णांना हृदयाच्या आकाराचे लाल रंगाची फुगे वाटून या मुलांसोबत एक आगळ्या-वेगळ्या पद्धतीने व्हॅलेंटाईन डे साजरा केला.
भारतीय मुलांमधील जन्मजात हृदय दोषची वाढती प्रकरणे ही चिंतेची बाब ठरत आहे. दरवर्षी देशात सुमारे दीड ते दोन लाख मुले जन्मजात हृदयविकारासह जन्माला येतात आणि त्यांना वेळीच उपचारांची आवश्यक असते. वैद्यकीय तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली असली तरी भारतातील अनेक मुलांमध्ये सीएचड वेळीच निदान आणि उपचार होत नाहीत. यामुळे अनेकदा गुंतागुंत निर्माण होऊन काही बालकांना जीव गमवाव लागतो. पालकांमध्ये याबाबत जागरूकतेच्या अभावाने निदानास विलंब होतो ज्यामुळे मुलांना जीवघेण्या परिस्थितीस सामोरे जावे लागते. वेळीच निदान व उपचार पर्यायांबाबत पुरेश्या जनजागृतीची आवश्यकता आहे. मुलांमध्ये सीएचडीची वाढती प्रकरणे लक्षात घेता, वाडिया हॉस्पिटलने व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशनसह सीएचडी सारख्या आजाराविषयी जनजागृती कार्यक्रम राबविला.
जन्मजात हृदयरोग जागरूकता सप्ताहाची सुरुवात जादूच्या प्रयोगांनी तसेच शैक्षणिक सत्राद्वारे करण्यात आली. या संपूर्ण कार्यक्रमात मुलांनी खास आनंद लुटला. हृदयविकाराशी लढा देणाऱ्या आणि हृदयविकाराच्या यशस्वी शस्त्रक्रिया झालेल्या धाडसी मुलांचा याठिकाणी सत्कार करण्यात आला. वाडिया हॉस्पिटल हे गंभीर आरोग्य आव्हानांना तोंड देत असलेल्या बालरोग रूग्णांवर प्रभावी उपचार करत त्यांना नवे आयुष्य बहाल करते. शैक्षणिक सत्रांच्या माध्यमातून पालकांना आपल्या मुलांचे आरोग्य निरोगी राहण्याकरिता वेळोवेळी तपासणी, निदान आणि उपचारांचे महत्त्व पटवून देण्यात आले. -डॉ. मिनी बोधनवाला, मुख्य कार्यकारी अधिकारी, वाडिया हॉस्पिटल