मुंबईची ‘वन राणी’ नॅशनल पार्कमध्ये पुन्हा दाखल; आता 'व्हिस्टाडोम' रुपात धावण्यास 'टॉय ट्रेन' सज्ज

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्रसिद्ध ‘वन राणी’ टॉय ट्रेन पुन्हा एकदा सुरू होणार आहे. पारदर्शक छप्पर व मोठ्या काचेच्या खिडक्यांसह तयार केलेली नवीन व्हिस्टाडोम टॉय ट्रेन, ही अहमदाबादहून आली असून...
मुंबईची ‘वन राणी’ नॅशनल पार्कमध्ये पुन्हा दाखल; आता 'व्हिस्टाडोम' रुपात धावण्यास 'टॉय ट्रेन' सज्ज
Published on

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्रसिद्ध ‘वन राणी’ टॉय ट्रेन पुन्हा एकदा सुरू होणार आहे. उद्यानातील एक प्रमुख आकर्षण असलेली ही टॉय ट्रेन प्रणाली नव्याने सुसज्ज करण्यात आली असून विशेषतः मुलांना आनंददायक व रोमांचकारी अनुभव देणार आहे.

पारदर्शक छप्पर व मोठ्या काचेच्या खिडक्यांसह तयार केलेली नवीन व्हिस्टाडोम टॉय ट्रेन, ही अहमदाबादहून आली असून तिच्या चाचणी फेऱ्या सुरू झाल्या आहेत.

२०२१ मध्ये आलेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीमुळे ही सेवा बंद झाली होती. मात्र उत्तर मुंबईचे खासदार व केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ‘वन राणी’च्या पुनरुज्जीवनाला पुन्हा गती मिळाली आणि उद्यानप्रेमी, निसर्गप्रेमी व लहान मुलांची ही जुनी मागणी आता पूर्ण होणार आहे.

चाचणी फेऱ्या यशस्वी झाल्यानंतर लवकरच नियमित सेवा सुरू होणार असून पर्यटक आणि विशेषतः लहान मुलांना मुंबईच्या हरित परिसरात फेरफटका मारण्याची पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. पावसाळ्यात उद्यानात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने हा उपक्रम अत्यंत योग्य वेळी सुरू होत आहे.

मूळ ‘वन राणी’ टॉय ट्रेन १९८० च्या दशकात (किंवा १९७०१) सुरू झाली होती. ती केवळ तीन डब्यांची होती, परंतु मुंबईकरांच्या अनेक पिढ्यांची ती आवडती सफर बनली होती. मे २०२१ मध्ये आलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे झाडे कोसळली, ट्रॅक खराब झाला आणि ट्रेन सेवा बंद झाली होती.

नवीन वैशिष्ट्ये आणि आधुनिक डिझाईनः

-पर्यावरणस्नेही : नवीन व्हिस्टाडोम ‘वन राणी’ ही बॅटरीवर चालणारी आहे व तिला चार डबे आहेत. पूर्वीच्या डिझेलवर चालणाऱ्या ट्रेनच्या तुलनेत ही अधिक पर्यावरणस्नेही आहे.

-काचांच्या खिडक्या : या डब्यांवर SGNP मधील प्राणी आणि निसर्गचित्रे रंगवलेली असून त्यामुळे ही सफर शैक्षणिकही ठरेल. पारदर्शक छत व मोठ्या काचांच्या खिडक्यांमुळे संपूर्ण परिसराचा विहंगम अनुभव घेता येईल.

-मेट्रोसारखी आसनरचना : या डब्यांची आसनरचना मेट्रोसारखी असून प्रवास अधिक आरामदायक ठरणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in