

अभिषेक पाठक
मुंबई : भारताच्या पहिल्या 'वंदे भारत फ्रेट' ईएमयू रेकची शनिवारी पश्चिम रेल्वेच्या मार्गावर १३० किमी प्रतितास वेगाने महत्त्वपूर्ण चाचणी घेण्यात आली. उच्च वेगाने धावणाऱ्या मालगाडीच्या कार्यक्षमतेची चाचणी करण्याच्या दृष्टीने ही चाचणी महत्त्वपूर्ण टप्पा मानली जात आहे. संशोधन अभिकल्प व मानक संघटना अर्थात 'आरडीएसओने अहमदाबाद-वडोदरा-मुंबई सेंट्रल मार्गावर कन्फर्मेटरी ऑसिलोग्राफ कार रन' घेतला. निर्धारित कार्यपद्धतीनुसार या रेकची चाचणी करण्यात आली.
साबरमती आयसीडीमध्ये ठेवलेल्या या रेकमध्ये आरडीएसओच्या पथकाने येथील अहमदाबाद विभागातील यांत्रिकी, विद्युत आणि एस अँड टी विभागाच्या सहकार्याने विविध उपकरणे बसवली. सकाळी ९ वाजता रेक अहमदाबादहून मुंबई सेंट्रलकडे रवाना झाला. उच्च वेगाच्या चाचणीसाठी पश्चिम रेल्वेने या रेकला स्वतंत्र मार्ग उपलब्ध करून दिला. दिवसा ही चाचणी घेण्यात आली असून, या काळात लागू असलेल्या सर्व कायमस्वरूपी करण्यात आले. आणि तात्पुरत्या वेगमर्यादांचे पालन
या चाचणीचे विशेष महत्त्व म्हणजे मालवाहतूक रेकमध्ये ५० टक्के पॉवर लोडिंग आणि २०.३२ टन अॅक्सल लोड असलेल्या बोगीचा वापर करण्यात आला आहे. चाचणीदरम्यान सेन्सर्स आणि डेटा अॅक्विझिशन प्रणालीच्या माध्यमातून नोंदवलेली माहिती आरडीएसओला रेकची धावण्याची वैशिष्ट्ये तसेच १३० किमी प्रतितासपर्यंतच्या वेगावरील कार्यक्षमता तपासण्यास मदत करणार आहे.
१३० किमी प्रतितास वेगाने वंदे भारत रेक चालविण्यास सक्षम असलेल्या चालक दलासह गार्ड, मुख्य लोको निरीक्षक, वाहतूक निरीक्षक आणि परमनंट वे निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली होती. सी अँड डब्ल्यू तसेच एस अँड टी विभागाचे कर्मचारीही रेकसोबत होते. मार्गात कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास तत्काळ उपाययोजना करण्यासाठी आयसीएफचे तांत्रिक कर्मचारी तसेच मेधा आणि केर्नचे प्रतिनिधीही उपलब्ध ठेवले होते.
वंदे भारत ही प्रवाशांमध्ये लोकप्रिय झालेली गाडी आहे. अतिशय अलिशान व सर्वसुविधानियुक्त या एक्स्प्रेसमध्ये अत्यंत आधुनिक सुविधा प्रवाशांना देण्यात आल्या आहेत. आता प्रवाशांसोबतच मालवाहतुकीसाठी वंदे भारत चालवण्याची योजना आखली जात आहे.
चाचणीसाठी जय्यत तयारी
चाचणीसाठी सुरक्षा आणि लॉजिस्टिक व्यवस्था करण्यात आली होती. चाचणीपूर्वी रेक सर्व बाबतींत पूर्णपणे तंदुरुस्त असल्याची खात्री करण्यात आली. तसेच रेकमध्ये बसवण्यात आलेल्या महागड्या तांत्रिक उपकरणांच्या सुरक्षेसाठी अहमदाबाद आणि मुंबई सेंट्रल येथे सुरक्षा पथकांकडून चोवीस तास सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली.