‘वंदे भारत मेट्रो’ पश्चिम रेल्वेवर धावणार? मुंबईत पहिली ट्रेन जुलैमध्ये येण्याची शक्यता

मुंबईकरांची ‘वंदे भारत मेट्रो’ची प्रतीक्षा लवकरच संपण्याची शक्यता आहे.
वंदे भारत मेट्रो
वंदे भारत मेट्रो(x-@railwaterman)

मुंबई : मुंबईकरांची ‘वंदे भारत मेट्रो’ची प्रतीक्षा लवकरच संपण्याची शक्यता आहे. मुंबईत १२ ‘वंदे भारत मेट्रो’ चालविण्याचा रेल्वे मंत्रालयाचा विचार आहे. त्यादृष्टीने एक ट्रेन जुलै महिन्यात मुंबईत येण्याची शक्यता आहे. याबाबत पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मात्र याबाबत माहिती नसल्याचे सांगितले.

रेल्वे मंत्रालयाने सुसज्ज अशा ‘वंदे भारत मेट्रो’ देशातील विविध राज्यांमध्ये चालविण्याचे ठरवले आहे. या ट्रेन ४, ८, १२ आणि १६ कोचच्या असणार आहेत. या गाडीचा वेग ताशी १३० प्रति किलोमीटर आहे. ‘वंदे भारत मेट्रो’ मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता या शहरात चालविण्याची रेल्वेची योजना आहे. पहिल्या टप्प्यात मुंबईत ‘वंदे भारत मेट्रो’ चालविण्याचा विचार आहे. या ट्रेनच्या कोचमध्ये ‘दिल्ली मेट्रो’प्रमाणे बसण्याची व्यवस्था आहे.

पंजाबमधील कपूरथळा येथील ‘रेल कोच फॅक्टरी’त या मेट्रोचे कोच तयार करण्यात येत आहेत. सध्या ५० ‘वंदे मेट्रो ट्रेन’ बनवण्याचे काम येथे सुरू आहे. हळहळू त्यांची संख्या ४०० पर्यंत नेण्यात येणार आहे. यापैकी पहिली ट्रेन मुंबईत चालविण्याचा विचार रेल्वे बोर्ड करत आहे. त्याप्रमाणे जुलै महिन्यात पहिली ट्रेन मुंबईत येऊ शकते, असे सूत्रांकडून समजते.

याबाबत पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या ट्रेनबद्दल आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले.

अशा असतील सुविधा

वंदे मेट्रोमध्ये एसी, स्वयंचलित दरवाजे, एलईडी दिवे, वाय-फाय, सीसीटीव्ही कॅमेरे, स्वच्छतागृह आणि प्रवासी माहिती प्रणाली अशा अनेक सुविधा असतील.

कोणत्या शहरांमध्ये धावणार?

दिल्ली-मेरठ, दिल्ली-गाझियाबाद, मुंबई-ठाणे, आग्रा-मथुरा अशा व्यस्त मार्गांवर ‘वंदे भारत मेट्रो’ धावण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in