

मुंबई : गीत 'वंदे मातरम्'च्या १५०व्या वर्षपूर्तीनिमित्त राज्यभर वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १८७५ साली लिहिले गेलेल्या या गीताला यंदा ७नोव्हेंबर रोजी १५० वर्षे पूर्ण होत असल्याने, राज्य सरकारने दीडशतकी वर्षपूर्तीचा उत्सव चार टप्प्यांत साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
वंदे मातरम्, बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले हे गीत स्वातंत्र्यलढ्याचा घोष बनले. १८९६ साली कोलकाता येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत प्रथम सादर केले होते. त्या काळापासून काँग्रेसच्या अधिवेशनात या गीताच्या पहिल्या दोन कडवी नेहमीच गायली जात होती. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी २४ जानेवारी १९५० रोजी संविधानसभेत जाहीर केले होते की वंदे मातरम्ला 'जन गण मन' या राष्ट्रगीताइतकेच स्थान मिळेल आणि त्याला तेवढ्याच सन्मानाने वागवले जाईल.
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्याने या दीडशतकी वर्षपूर्तीसाठी वर्षभर कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवले आहे. त्याची सुरुवात म्हणून राज्यातील सर्व शाळांना राष्ट्रीय गीताचे संपूर्ण सादरीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या शासननिर्णयात संपूर्ण गीत की फक्त पहिली दोन कडवी गायची, याबाबत स्पष्ट उल्लेख नाही. वर्षभर चालणाऱ्या या उपक्रमासाठी जिल्हा स्तरावर समित्या स्थापन करण्यात येतील.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील या समित्यांमध्ये महापालिका आयुक्त किंवा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, पोलीस आयुक्त किंवा जिल्हा पोलिस प्रमुख, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, शिक्षण, क्रीडा आणि माहिती विभाग प्रमुख अधिकारी यांचा समावेश असेल. निवासी उपजिल्हाधिकारी हे समितीचे सदस्य सचिव असतील. सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये या निमित्ताने विशेष कार्यक्रम होणार असून ७नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय स्तरावर मुख्य कार्यक्रम होईल. त्यानंतर जिल्हा स्तरावर 'वंदे मातरम्'चे सामूहिक गान आयोजित केले जाईल. शाळांना निबंध, वादविवाद आणि पोस्टर स्पर्धांचे आयोजन करण्यास सांगितले जाईल. राज्य पोलीस बँड सार्वजनिक ठिकाणी वंदे मातरम् आणि इतर देशभक्तिपर गीतांचे सादरीकरण करणार आहे. तसेच राष्ट्रीय गीताशी संबंधित प्रश्नमंजुषा, प्रदर्शन आणि प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात 'वंदे मातरम्' हा विषय असणार आहे. याशिवाय 'कराओके' सुविधेसह ध्वनिचित्रफीत बूथ उभारण्यात येतील, जिथे नागरिक हे गीत गायन करून ते एका खास पोर्टलवर अपलोड करू शकतील.
या उत्सवाचे चार टप्पे असतील
पहिला टप्पा : ७ ते १४ नोव्हेंबर
दुसरा टप्पा : १९ नोव्हेंबरपासून पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनापर्यंत. तिसरा टप्पा ७ ते १५ ऑगस्ट, अंतिम टप्पा १ ते ७ नोव्हेंबर २०२६