Mumbai : ५ वर्षांनंतर 'वनराणी' पुन्हा रुळावर; केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सर्वांचेच आकर्षण स्थान असलेली 'वनराणी' ही टॉयट्रेन शनिवारपासून पुन्हा रुळावर आली आहे. 'वनराणी' चे स्वागत करण्यासाठी मुंबईकरांनी एकच गर्दी केली होती. आता परीक्षा संपल्यानंतर 'वनराणी'चा आनंद घेण्यासाठी मुंबईकरांची पावले पुन्हा राष्ट्रीय उद्यानाकडे वळणार आहेत.
Mumbai : ५ वर्षांनंतर 'वनराणी' पुन्हा रुळावर; केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन
Published on

मुंबई : बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सर्वांचेच आकर्षण स्थान असलेली 'वनराणी' ही टॉयट्रेन शनिवारपासून पुन्हा रुळावर आली आहे. 'वनराणी' चे स्वागत करण्यासाठी मुंबईकरांनी एकच गर्दी केली होती. आता परीक्षा संपल्यानंतर 'वनराणी'चा आनंद घेण्यासाठी मुंबईकरांची पावले पुन्हा राष्ट्रीय उद्यानाकडे वळणार आहेत.

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते नवीन 'वनराणी' टॉय ट्रेन जनतेसाठी समर्पित केली. यामुळे मुलांसाठी, कुटुंबांसाठी आणि निसर्गप्रेमींसाठी मुंबईतील एक लोकप्रिय आकर्षण पुन्हा सुरू झाले आहे.

ही टॉय ट्रेन आधुनिक बॅटरीवर चालणाऱ्या इंजिनांनी सुसज्ज असून तिची स्थानकेही सुधारली आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या मुलांनी पियूष गोयल यांच्यासोबतच टॉय ट्रेनची सफरही केली.

१९७० पासूनची परंपरा

'जंगलाची राणी' म्हणून ओळखली जाणारी वनराणी टॉय ट्रेन १९७० च्या दशकापासून मुंबईच्या ओळखीचा अविभाज्य भाग राहिली आहे. शहरातील सर्वात मोठ्या हरित पट्ट्यातून जाणाऱ्या या ट्रेनमुळे अनेक पिढ्यांतील मुलांना आणि पर्यटकांना निसर्गरम्य अनुभव मिळत आला आहे.

मात्र २०२१ मध्ये आलेल्या तोक्ते चक्रीवादळात तिचे मोठे नुकसान झाल्यानंतर ही सेवा बंद करण्यात आली होती.

आधुनिक आणि पर्यावरणपूरक ट्रेन

नवी वनराणी ट्रेन पूर्णपणे बॅटरीवर चालणारी आणि पर्यावरणपूरक आहे. यात आधुनिक डबे, सुधारित सुरक्षा व्यवस्था आणि अद्ययावत स्थानके तयार करण्यात आली आहेत. ट्रेनमध्ये 'हेरिटेज' तसेच 'व्हिस्टा डोम' शैलीचे डबे देण्यात आले असून प्रवाशांना जंगलाच्या निसर्गसौंदर्याचा पॅनोरामिक अनुभव घेता येणार आहे.

केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले, की 'या प्रकल्पाच्या उद्घाटनाबाबत प्रस्ताव आला तेव्हा मी सांगितले की, व्हीआयपी वेळापत्रकाची वाट पाहण्याची गरज नाही. मुलांना आणि कुटुंबांना आनंद देण्यासाठी टॉय ट्रेन तत्काळ सुरू व्हावी.' ट्रेनच्या व्हिस्टा डोम शैलीच्या डब्यांना त्यांनी रेल्वेमंत्री असताना पर्यटनासाठी सुरू केलेल्या विशेष डब्यांपासून प्रेरणा मिळाल्याचेही सांगितले. कान्हेरी गुंफा या ऐतिहासिक वारसा स्थळाचा विकास करून त्याला जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ बनवण्याची योजनाही त्यांनी जाहीर केली.

सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या माध्यमातून पर्यटकांसाठी अधिक सुविधा निर्माण करून जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. "कान्हेरी लेण्यांना ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. भगवान बुद्धांचा वारसा येथे जतन झालेला आहे. तो जगभरातील लोकांनी अनुभवावा, अशी आमची इच्छा आहे," असे ते म्हणाले. मंडपेश्वर गुंफा या वारसा स्थळांचा विकास आणि मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांचे सुशोभीकरण सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in