

मुंबई : महायुती सरकारने मेट्रो स्टेशनची नावे स्पॉन्सर करून देवीदेवता व महापुरुषांचा अपमान केला आहे. सिद्धीविनायक मंदिर, काळबादेवी, महालक्ष्मी तसेच छत्रपती शिवाजी महाराज, आचार्य अत्रे यांच्या नावाने असलेल्या स्टेशनला कार्पोरेट कंपन्यांची नावे देऊन भाजपने कार्पोरेट हिंदुत्व आणले आहे. मेट्रो स्टेशनची नावे स्पॉन्सर करून पैसे कमवायला महायुतीला भिक लागली आहे का, असा सवाल करून नावे बदला, अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
मेट्रो स्टेशनच्या नावावरून मुंबई काँग्रेसने आज सिद्धिविनायक मंदिराजवळ आंदोलन करून भाजपा महायुतीचा निषेध केला. आंदोलनात खासदार वर्षा गायकवाड, प्रणिल नायर, सचिन सावंत, सुरेशचंद्र राजहंस, कचरू यादव, रवी बावकर, राजपती यादव, केतन शाह, भावना जैन, अर्शद आझमी इत्यादी नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी प्रसारमाध्यमांना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, थोर कवी आचार्य अत्रे तसेच आधुनिक भारताच्या निर्माण कार्यात आपले अमूल्य योगदान देणारे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि संजय गांधी यांनी देशासाठी मोठे योगदान दिले आहे. महायुतीने बाजार मांडून आपला ऐतिहासिक वारसा, संस्कृती व परंपरा कंपन्यांना विकल्या आहेत.
पटेल व शहा यांची तुलना अयोग्य...
गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यावेळी 'लोहपुरुष' असे बॅनर लावून भाजपने सरदार वल्लभाई पटेल यांचा अपमान केला आहे. अमित शहा 'लोहपुरुष' कसे झाले? महान नेतृत्वाशी अमित शाह यांची तुलना होऊच शकत नाही, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.