महिला डॉक्टर विनयभंगप्रकरणी डॉक्टरला अटक; विशाखा समितीमध्ये सुनावणी सुरू

वसईतील प्रसिद्ध कार्डिनल ग्रेशस रुग्णालयातील महिला डॉक्टरचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी डॉक्टर अंजुम शेख यांना वसई पोलिसांनी अटक केली आहे.
महिला डॉक्टर विनयभंगप्रकरणी डॉक्टरला अटक; विशाखा समितीमध्ये सुनावणी सुरू
Published on

वसई : वसईतील प्रसिद्ध कार्डिनल ग्रेशस रुग्णालयातील महिला डॉक्टरचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी डॉक्टर अंजुम शेख यांना वसई पोलिसांनी अटक केली आहे. शेख यांना २ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणी रुग्णालयाच्या विशाखा समिती अंतर्गत चौकशी सुरू असल्याचे रुग्णालयाने सांगितले.

तक्रारदार पीडित डॉक्टर या २००९ पासून रुग्णालयात कार्यरत आहेत. त्यांनी रुग्णालयाचे वरिष्ठ सहकारी अंजुम अब्दुल सलाम शेख (५४) यांनी फेब्रुवारी २०२३ ते २०२५ या काळात रुग्णालयात लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे. अश्लील शेरेबाजी करणे, सीसीटीव्ही बंद करून लगट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे. याबाबत १ फेब्रुवारी रोजी पीडित डॉक्टरने रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडे तक्रार दिली होती. त्यानंतर दोन वेळा विशाखा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. मी रुग्णालयाच्या विशाखा समितीकडे तक्रार दिली. मात्र त्यानंतरही डॉक्टरने मला धमकावल्याने मी पोलीस ठाण्यात तक्रार दिली, असे पीडित डॉक्टरने बोलताना सांगितले.

वसई पोलिसांनी डॉक्टर अंजुम अब्दुल सलाम शेख (५४) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शेख याला अटक केली असून न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे, अशी माहिती वसई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक महेंद्र भामरे यांनी दिली.

विशाखा समितीमध्ये सुनावणी सुरू

तक्रारदार महिला डॉक्टरने १ फेब्रुवारी रोजी डॉ. शेख यांच्या विरोधात लेखी पत्र दिले होते. पहिल्या पत्रात त्यांनी डॉ. शेख यांनी कार्यालयीन ठिकाणी २०२३ मध्ये अश्लील शेरेबाजी केल्याची तक्रार केली होती. त्यानुसार रुग्णालयाच्या अध्यक्षांनी तात्काळ बैठक आयोजित केली आणि त्यांचे सविस्तर म्हणणे ऐकून घेतले होते, असे रुग्णालयाच्या महाव्यवस्थापिका फ्लोरी डिमेंटे यांनी सांगितले. तक्रारदार डॉक्टरने यानंतर दिलेली दोन्ही पत्रे पुढील कारवाईसाठी विशाखा समितीकडे पाठविण्यात आले आहे. त्यांच्या तक्रारीवर विशाखा समितीमध्ये चौकशी सुरू आहे, असेही डिमेंटो यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in