
वसई : 'आमची वसई' सामाजिक समूह, धर्मसभा तसेच वसई-विरार, नायगाव आणि नालासोपारा परिसरातील देश-धर्माभिमानी नागरिकांच्या सहभागातून ऐतिहासिक वसई किल्ल्यात दीपोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
हजारो पणत्या, शेकडो आकाशकंदील आणि १०० मशालींच्या दिमाखदार उजेडात वसईचा किल्ला उजळून निघाला. वाद्यांच्या गजरात "जय वज्राई, जय चिमाजी" च्या घोषणांनी वातावरण दुमदुमले. दीपोत्सवात आणि त्यानिमित्त घेण्यात आलेल्या रांगोळी, कंदील स्पर्धा आणि मशाल यात्रेला वसईकरांचा मोठा प्रतिसाद मिळाला. इतिहासात २१ हजार हिंदवी सैनिकांनी वसईच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करले. त्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ वसईकर दरवर्षी नागेश महातीर्थ येथे दीपोत्सव साजरा करतात. "वसईला मिळालेल्या स्वातंत्र्यामागे हिंदवी सैन्याची देव-देश-धर्म निष्ठा विसरता कामा नये. हुतात्म्यांचे बलिदान हे आपले स्वराज्य टिकवणारे प्रेरणास्थान आहे," असा संदेश धर्मसभा-विद्वत्संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य यांनी दिला.
यावेळी 'लीलाई'च्या २६व्या दिवाळी अंकाचे प्रकाशन वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी संपादिका सौ. पूजा रोकडे, अभिनेत्री साक्षी नाईक, समाजसेवक अग्नेलो दोडती, सहकार नेते शरद पाटील, आयटी तज्ज्ञ राहुल भंडारकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिलराज रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार अनिलराज रोकडे यांनी युवकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले, तर 'वसई लाइव्ह' चे मोझेस डिसोझा यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अखेरीस 'आमची वसई' चे रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.