१०० मशाली व हजारो पणत्यांनी उजळणार वसई किल्ला; प्रत्येक गावातून ५०१ दिवे स्मारकात लावण्याचे आवाहन

येत्या रविवारी, १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता नरवीर चिमाजी आप्पा स्मारक, वसई किल्ला येथे सालाबाद प्रमाणे वसई दुर्ग दीपोत्सव साजरा होणार आहे.
१०० मशाली व हजारो पणत्यांनी उजळणार वसई किल्ला; प्रत्येक गावातून ५०१ दिवे स्मारकात लावण्याचे आवाहन
Published on

अनिलराज रोकडे/वसई

येत्या रविवारी, १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता नरवीर चिमाजी आप्पा स्मारक, वसई किल्ला येथे सालाबाद प्रमाणे वसई दुर्ग दीपोत्सव साजरा होणार आहे.

फेथांध पोर्तुगीजांच्या अमानुष जाचेमुळे हतबल व असहाय्य झालेल्या वसईकरांना मुक्त करण्यासाठी २१,००० मराठा हुतात्मा झाले, तर अनेकांच्या अर्धांगिनी स्वेच्छेने सती गेल्या. आपल्या कुटुंबाचा आणि जीवाचा त्याग करून त्यांनी दिवाळी-दसरा आपल्या घरी साजरी करण्याची परंपरा थांबवली.

दिवाळीत संपूर्ण वसई-विरार शहर, घरे, दुकाने, मंदिर, चर्च, मॉल्स व रस्ते प्रकाशमान असतात; परंतु मराठा सैन्याच्या शौर्याचा साक्षीदार असलेला वसईचा किल्ला मात्र अंधारात राहतो. पूर्वापार काही स्थानिक परिवार आणि धर्मसभा नागेश महातीर्थ व श्री नागेश्वर मंदिर परिसरात दीपावली साजरी करतात. मराठा सैन्य आणि भारतीय जवानांच्या पराक्रमामुळे आपण आज दिवाळी आनंदात साजरी करत आहोत. त्या पराक्रमी सैन्यास मानवंदना अर्पण करण्यासाठी "आमची वसई" सामाजिक संस्था दरवर्षी प्रमाणे वसई किल्ल्यात दीपोत्सव साजरा करणार आहे.

दीपोत्सवात मशाल मिरवणूक, रंगबेरंगी रांगोळ्या, आकाश कंदील, नरवीर चिमाजी आप्पा स्मारक प्रज्वलित करणे यासह प्रवेशद्वार, तटबंदी, सागरी दरवाजा, सतीचा पार, ध्वजस्तंभ, हनुमान मंदिर व नागेश महातीर्थ परिसरात पणत्या व तोरण लावण्यात येणार आहेत.

सर्व नागरिकांना आवाहन

१९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता कमीत कमी एक पणती व त्यासाठी लागणारे तेल व वाती घेऊन चिमाजी आप्पा स्मारकात हजर रहावे. प्रत्येक गावाच्या ग्रामस्थांनी कर्तव्यभावनेने गावातून किमान ५०१ पणत्या लावून किल्ला उजळवावा. या प्रसंगी सर्व वयोगटातील महिला व पुरुषांसाठी रांगोळी स्पर्धा व कंदील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी संपर्क: आमचे वसई सामाजिक समूह – ९३२३३९५५९८.

logo
marathi.freepressjournal.in