वसई : वसईतील पापडी येथील प्रतिष्ठित अवर लेडी ऑफ ग्रेस कॅथेड्रलला या ऐतिहासिक चर्चला सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी २०२५ चा UNESCO Asia-Pacific Awards for Cultural Heritage Conservation मधील ‘मेरिट पुरस्कार’ जाहीर झाला आहे. बँकॉक येथे पार पडलेल्या सन्मान सोहळ्यात या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
युनेस्कोने जाहीर केलेल्या आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील सर्वोत्तम दहा संवर्धन प्रकल्पांमध्ये वसईतील ४५२ वर्षे जुन्या या कॅथेड्रलचा समावेश आहे. सोळाव्या शतकातील पोर्तुगीज स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धनासाठी सुमारे ४.७५ कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला होता.
या जीर्णोद्धाराचे वैशिष्ट्य म्हणजे सिमेंटचा वापर टाळून पारंपरिक पद्धतीने चुन्याच्या साहाय्याने दुरुस्ती करण्यात आली. मुंबईतील ‘सवानी हेरिटेज कॉन्सर्व्हेशन’ या वास्तुविशारद संस्थेने, वसईतील गिरिज येथील ‘सिक्वेरा फाइन आर्ट’ तसेच स्थानिक कुशल कारागिरांच्या सहकार्याने २०२३-२४ या कालावधीत चर्चचे काम पूर्ण केले. गाभाऱ्याचा भाग आकर्षक लाकडी कोरीवकामाने सजविण्यात आला आहे.
युनेस्कोने आपल्या प्रशस्तीपत्रात नमूद केले आहे की, महाराष्ट्रातील ख्रिस्ती धर्मप्रसाराचा हा जिवंत पुरावा असून पारंपरिक कारागिरीच्या वापरातून केलेले संवर्धन उल्लेखनीय आहे. सूक्ष्म आणि जाणीवपूर्वक केलेल्या हस्तकलेमुळे हे प्रार्थनास्थळ पुन्हा जुन्या वैभवात नटले आहे. २००० पासून दरवर्षी युनेस्कोकडून आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या वास्तू, वसाहती आणि प्रकल्पांना गौरविण्यात येते.
यंदा या पुरस्कारांना २५ वर्षे पूर्ण झाली असून रौप्यमहोत्सवी वर्षात १६ देशांमधून ९० नामांकने प्राप्त झाली होती. सात सदस्यीय आंतरराष्ट्रीय परीक्षक समितीने ऐतिहासिक व सांस्कृतिक
महत्त्वाचे जतन, तांत्रिक कौशल्य, शाश्वतता आणि समाजावरील दीर्घकालीन सकारात्मक परिणाम या निकषांवर विजेते प्रकल्प निवडले. परीक्षकांच्या मते, वाढते शहरीकरण आणि पर्यावरणीय आव्हानांना तोंड देत स्थानिक समुदायांच्या गरजांशी सुसंगत राहून वारसा जपण्याचे हे उत्तम उदाहरण आहे.
वसईतील अवर लेडी ऑफ ग्रेस कॅथेड्रलची या पुरस्कारासाठी निवड होणे ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. युनेस्कोच्या या पुरस्कारांमध्ये हे एकमेव प्रार्थनास्थळ आहे. चर्चचा झालेला हा सन्मान प्रत्येक भारतीयासाठी गौरवाची गोष्ट आहे.
फादर जॉन फर्गोस, धर्मगुरू, अवर लेडी ऑफ ग्रेस कॅथेड्रल
‘या’ प्रकल्पांचाही सन्मान
१) सिहांग वेअरहाऊस संवर्धन प्रकल्प, शांघाय, चीन
२) इवामी गिन्झान ग्रंथालय संवर्धन प्रकल्प, ओडा, जपान
३) अझेके संवर्धन प्रकल्पातील हानी गाव, युनान, चीन
४) शियानकेंग गाव संवर्धन प्रकल्प, ग्वांगडोंग, चीन
५) अवर लेडी ऑफ ग्रेस कॅथेड्रल संवर्धन प्रकल्प, वसई, भारत
६) ज्येष्ठ वर्ण महाविहार संवर्धन प्रकल्प, ललितपूर, नेपाळ
७) लोवो निफुग नामरोल नॉरबुलिंग मठ संवर्धन प्रकल्प, मुस्तांग, नेपाळ
८) योंग’आन गाव, युनान, चीन
९) एस्प्लेनेड सीवॉल आणि प्रोमेनेड, जॉर्ज टाऊन, मलेशिया
१०) तन्ना बेट संवर्धन प्रकल्प, तन्ना, वानुआटु