वसईतील शाळेत १०० उठाबशांची शिक्षा विद्यार्थिनीच्या जीवावर बेतली; पालक, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण

वसई पूर्व सातिवली येथील श्री हनुमंत विद्या मंदिर शाळेतील काजल गौड (१३) या विद्यार्थिनीला १०० उठाबशा काढण्याची शिक्षा तिच्या जीवावर बेतली आहे. त्यामुळे पालक व नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
वसईतील शाळेत १०० उठाबशांची शिक्षा विद्यार्थिनीच्या जीवावर बेतली; पालक, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण
वसईतील शाळेत १०० उठाबशांची शिक्षा विद्यार्थिनीच्या जीवावर बेतली; पालक, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरणप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

पालघर : वसई पूर्व सातिवली येथील श्री हनुमंत विद्या मंदिर शाळेतील काजल गौड (१३) या विद्यार्थिनीला १०० उठाबशा काढण्याची शिक्षा तिच्या जीवावर बेतली आहे. त्यामुळे पालक व नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

काजल गौड ही विद्यार्थिनी श्री हनुमंत विद्यामंदिर शाळेत शिकते. शुक्रवारी तिला शाळेत येण्यास उशीर झाला. त्यामुळे शिक्षकांनी तिला दप्तरासह १०० उठाबशा काढण्याची शिक्षा देण्यात आली होती. या उठाबशा काढताना तब्येत बिघडल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे पालक आणि नागरिकांमध्ये प्रचंड संताप असून शाळेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

८ नोव्हेंबर रोजी काही विद्यार्थी शाळेत उशिरा पोहोचले होते. त्यामुळे शिक्षकांनी त्यांना शिक्षा म्हणून १०० उठाबशा काढण्यास सांगितले. काही विद्यार्थ्यांना दप्तर पाठीवर असतानाच उठाबशा काढायला लावल्या होत्या. या शिक्षेमध्ये काजलचाही सहभाग होता. घरी परतल्यानंतर तिला अंगदुखीचा त्रास सुरू झाला. तिला तात्काळ वसईच्या आस्था रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र स्थानिक पातळीवर योग्य उपचार उपलब्ध न झाल्याने अखेर तिला जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले.

तिला वाचवण्याचे खूप प्रयत्न झाले. अखेर १४ नोव्हेंबरच्या रात्री सुमारे रात्री ११ वाजता तिचे निधन झाले. या घटनेची जबाबदारी स्वीकारण्यास शाळेने नकार दिल्याचा आरोप काजलच्या कुटुंबियांनी आणि स्थानिक नागरिकांनी केला. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी शाळा प्रशासनासमोर जाऊन विद्यार्थिनीला न्याय मिळवून देण्याची मागणी केली. तसेच शाळेविरोधात कारवाई करण्याची मागणी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडेकरण्यात आली आहे.

या घटनेची माहिती गोळा करण्याचे काम सुरू असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वालीव पोलिसांनी दिली आहे. या घटनेची सविस्तर चौकशी करून अहवाल सादर केला जाणार आहे.

शिक्षण कायद्यानुसार विद्यार्थ्यांना शारीरिक किंवा मानसिक शिक्षा करणे हा गुन्हा असल्याचे वसईचे गटशिक्षणाधिकारी पांडुरंग गलांगे यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in