मतपत्रिका शासकीय मुद्रणालयातूनच मुद्रित; मतपत्रिकेवरील चिन्हांच्या आक्षेपावर निवडणूक विभागाचे स्पष्टीकरण

वसई-विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर मतपत्रिकेवरील निवडणूक चिन्हे अस्पष्ट असल्याच्या तक्रारी बहुजन विकास आघाडी तसेच काही अन्य राजकीय पक्षांकडून करण्यात आल्या होत्या. या आक्षेपांबाबत वसई-विरार महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाने अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर मतपत्रिकेवरील निवडणूक चिन्हे अस्पष्ट असल्याच्या तक्रारी बहुजन विकास आघाडी तसेच काही अन्य राजकीय पक्षांकडून करण्यात आल्या होत्या. या आक्षेपांबाबत वसई-विरार महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाने अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे.

निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व उमेदवारांची अंतिम नावे जाहीर झाल्यानंतर मतदानासाठी आवश्यक असलेल्या उमेदवारांची नावे व चिन्हे नमूद असलेल्या मतपत्रिका शासकीय मुद्रणालय, चर्नी रोड, मुंबई येथून मुद्रित करून आणण्यात आल्या आहेत. याच शासकीय मुद्रणालयात राज्यातील इतर महापालिकांच्याही मतपत्रिकांची छपाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे सदर तक्रारींमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या दि. ८ नोव्हेंबरच्या अधिसूचनेनुसार, वसई-विरार शहर मनपातील सर्व निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमार्फत सार्वत्रिक निवडणूकसाठी उमेदवारांना देण्यात येणाऱ्या निवडणूक चिन्हांची अधिकृत जाहीर प्रसिद्धी करण्यात आली होती. त्यानुसार उमेदवारांनी त्यांच्या पसंतीचे चिन्ह उमेदवारी अर्जामध्ये नमूद केले होते. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नियमानुसार चिन्ह वाटपाची प्रक्रिया पूर्ण करून उमेदवारांना मतपत्रिकेवर छापावयाच्या नाव व चिन्हाबाबत माहिती दिली होती. त्या वेळी कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नव्हती, असेही निवडणूक विभागाने नमूद केले आहे. त्यानंतर काही राजकीय पक्षांनी लेखी व तोंडी स्वरूपात तक्रारी केल्यानंतर, आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी क्र. १ यांच्या कार्यालयास भेट देऊन संबंधित पक्षांच्या उमेदवारांशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार मतपत्रिकेवरील चिन्हांबाबतची वस्तुस्थिती उमेदवारांना समजावून सांगण्यात आली, ती त्यांनी मान्य केल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

तसेच काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी इतर कामानिमित्त आयुक्तांकडे आले असता, त्यांना राज्य निवडणूक आयोगाचे आदेश तसेच निवडणूक चिन्हांबाबतची माहिती दाखविण्यात आली.

तक्रारींमध्ये कोणतेही तथ्य नाही

वसई-विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने मतपत्रिकेवरील अंतिम उमेदवारांची नावे व निवडणूक चिन्हांबाबत महानगरपालिका निवडणूक विभाग व सर्व निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांनी राज्य निवडणूक आयोगाच्या नियमांनुसारच योग्य ती कार्यवाही केली आहे. त्यामुळे करण्यात आलेल्या तक्रारींमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in