दोघा ठाकरेंनाही जमले नाही, ते ठाकूरांनी करून दाखवले! उबाठा सेनेच्या मिलिंद नार्वेकरांकडून ठाकूर बंधूंचा सत्कार

मुंबईच्या वेशीवर असलेल्या वसई-विरार महापालिकेत बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी भाजप-शिवसेना महायुतीचा अश्वमेध रोखत आपला बालेकिल्ला शाबूत ठेवला, ही बाब राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे.
दोघा ठाकरेंनाही जमले नाही, ते ठाकूरांनी करून दाखवले! उबाठा सेनेच्या मिलिंद नार्वेकरांकडून ठाकूर बंधूंचा सत्कार
Published on

अनिलराज रोकडे/ वसई

राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये बहुतांश ठिकाणी भाजप-शिवसेना महायुती विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) सेना अशी थेट लढत पाहायला मिळाली. राजधानी मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशात महायुतीने जोरदार मुसंडी मारत सत्ता हस्तगत केली. मुंबई महापालिकेवर तब्बल अडीच दशकांची ठाकरे घराण्याची सत्ता अबाधित ठेवण्यासाठी दोन टोकाला गेलेले ठाकरे बंधू एकत्र आले, मात्र तरीही महायुतीचा विजय रोखता आला नाही.

याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या वेशीवर असलेल्या वसई-विरार महापालिकेत बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी भाजप-शिवसेना महायुतीचा अश्वमेध रोखत आपला बालेकिल्ला शाबूत ठेवला, ही बाब राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे. वर्षभरापूर्वी विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतरही महापालिकेत वर्चस्व राखण्यात ठाकूर यांना मिळालेले यश विशेष मानले जात आहे.

या विजयाने भारावून गेलेल्या उबाठा सेनेचे आमदार व उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी थेट विरार गाठत बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर, भाई ठाकूर, दीपक ठाकूर, पंकज ठाकूर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. मात्र, या घटनेमुळे उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

वसई-विरार महापालिका निवडणुकीत ८९ जागा लढवूनही एकही जागा न मिळाल्याने उबाठा सेनेचा दारुण पराभव झाला आहे. अशा परिस्थितीत नार्वेकरांनी विरोधकांचा सत्कार केल्याने अनेक शिवसैनिकांच्या जिव्हारी ही बाब लागली असून, “टायमिंग चुकले” अशी उघड नाराजी व्यक्त केली जात आहे.

निवडणुकीपूर्वी बहुजन विकास आघाडीसोबत जागावाटपावरून बोलणी फिसकटली आणि उबाठा सेनेने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. २००९ मध्ये वसईत विधानसभा जिंकणाऱ्या सेनेला यावेळी मोठा पराभव पत्करावा लागला. या संपूर्ण प्रक्रियेतून बाजूला ठेवल्याचा आरोप करत माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण आणि माजी विरोधी पक्षनेते विनायक निकम यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे.

सैनिकांना एकाकी लढताना रसद पुरविण्याऐवजी वरिष्ठ नेत्यांनी वाऱ्यावर सोडून दिले. गरज असताना मदतीला कोणी फिरकले नाही. स्वकीयांच्या पराभवाच्या जखमांवर फुंकर न घालता विरोधकांचा विजय साजरा करायला जाण्याच्या संकेतबाह्य घटनेचा मी धिक्कार करतो. आधी शाखांना भेटी देऊन सैनिकांची विचारपूस व्हायला हवी होती.

विनायक निकम

logo
marathi.freepressjournal.in