वसई : व्यावसायिक एलपीजी (गॅस) सिलिंडरच्या गंभीर तुटवड्यामुळे वसई-विरारमधील हॉटेल उद्योग मोठ्या संकटात सापडला आहे. परिसरात एकूण सुमारे १५०० हॉटेल्स असून त्यापैकी ३०० बार-रेस्टॉरंट्स आहेत. गेल्या आठवडाभरापासून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा पूर्णपणे बंद असल्यामुळे आतापर्यंत सुमारे ३० टक्के हॉटेल्सने आपले दरवाजे बंद केले आहेत. पुढील दोन दिवसांत हा आकडा ६० टक्क्यांपर्यंत वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हॉटेल व्यावसायिकांच्या मते, गॅसशिवाय स्वयंपाक करणे अशक्य असल्याने अनेकांना व्यवसाय तात्पुरता बंद ठेवण्याची वेळ आली आहे. हॉटेल संघटनेचे सचिव विहंग म्हात्रे यांनी सांगितले की, येत्या २४ तासांत किमान ५० टक्के गॅस सिलिंडरचा पुरवठा झाला नाही, तर सर्व हॉटेल्स बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो.
दरम्यान, पालघर जिल्हा प्रशासनाकडून हॉटेल उद्योगासाठी गॅस पुरवठा पूर्णपणे थांबवण्यात आल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सध्या गॅस पुरवठा करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केल्याने हॉटेल मालकांसह हजारो कामगारांच्या रोजगारावर गंभीर संकट निर्माण झाले आहे.
गॅस टंचाईमुळे अनेक हॉटेल्सकडून पर्यायी उपाययोजना करण्यात येत आहेत. काही ठिकाणी इंडक्शन कुकर व इलेक्ट्रिक ओव्हनचा वापर वाढवण्यात आला आहे.
गॅस जास्त लागणारे पदार्थ तात्पुरते मेन्यूमधून वगळले जात असून उर्वरित गॅस वाचवण्यासाठी काही स्वयंपाकघर फक्त गर्दीच्या वेळेतच चालवली जात आहेत. मात्र ज्यांना पर्यायी साधने उपलब्ध नाहीत किंवा गॅस मिळू शकलेला नाही, अशा अनेक हॉटेल मालकांना हॉटेल्स अनिश्चित काळासाठी बंद ठेवावी लागली असल्याची माहिती हॉटेल व्यावसायिकांनी दिली.
वसई तालुक्यातील व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या कृत्रिम तुटवड्याचे दुरुस्ती करून सिलिंडरचा पुरवठा त्वरित सुरू करावा, याबाबत वसई तालुक्याचे नायब तहसीलदार शशिकांत नाचण यांची भेट घेऊन प्रशासनाकडे मागणी केली आहे. वसई तालुक्यातील व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा थांबला असून हॉटेल, खानावळ आणि इतर उद्योगधंद्यांवर मोठा परिणाम झाला आहे. त्याचा थेट परिणाम कामगार वर्गावरही होत असून अनेकांना उपासमारीची भीती निर्माण झाली आहे. प्रसार माध्यमांमार्फत सांगितले जात आहे की गॅस पुरवठा सुरळीत आहे, तरी वसईत व्यावसायिक गॅस सिलिंडर का मिळत नाही? यावर त्वरित निर्णय घेणे आवश्यक आहे.
समीर वर्तक, काँग्रेस
किमान ५० टक्के पुरवठ्याची मागणी
हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष मोहन शेट्टी यांनी सरकारकडे हॉटेल उद्योगाला अत्यावश्यक सेवा वर्गात समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. संपूर्ण पुरवठा बंद करण्याऐवजी किमान ५० टक्के गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिल्यास उद्योग पूर्णपणे कोसळण्यापासून वाचू शकतो, असे त्यांनी सांगितले. वसई-विरार परिसरातील ३५० पेक्षा अधिक हॉटेल्समध्ये लग्नसमारंभ व इतर कार्यक्रमांसाठी आगाऊ बुकिंग्स घेतल्या आहेत. त्यामुळे गॅसअभावी या कार्यक्रमांची व्यवस्था कशी करावी, हा मोठा प्रश्न हॉटेल मालकांसमोर उभा राहिला आहे.