
आशीष सिंग / मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी वसई-विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार आणि त्यांच्या पत्नी भारती पवार यांची १० तासांहून अधिक वेळ चौकशी केली. ही चौकशी बेकायदेशीर भूविकास, मोठ्या प्रमाणातील अतिक्रमण आणि सार्वजनिक जमिनीवरच्या अनधिकृत बांधकामाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात सुरू आहे.
मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत सुरू असलेल्या या चौकशीचा केंद्रबिंदू वसई-विरार परिसरातील सांडपाणी प्रक्रिया केंद्रे आणि डंपिंग ग्राऊंडसाठी राखीव असलेल्या महापालिकेच्या जमिनींवर मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामाशी संबंधित आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांनुसार, आयएएस अधिकारी अनिल पवार यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी अनेक प्रकल्पांच्या एकूण बांधकाम क्षेत्रावर आधारित प्रति चौरस फूट २० ते २५ रुपये लाचेच्या स्वरूपात घेतले आणि त्याच्या बदल्यात अनधिकृत मंजुरी दिली. बेकायदेशीर बांधकामांना उत्तेजन दिले. तपास अधिकाऱ्यांना संशय आहे की, पवार यांनी राजकीयदृष्ट्या प्रभावशाली विकासकआणि वरिष्ठ महापालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने पालिकेच्या नियमांचे पद्धतशीर उल्लंघन केले.
सूत्रांनी सांगितले की, अनिल पवार यांनी याआधी ईडीच्या पहिल्या समन्सला उपस्थित राहणे टाळले होते आणि दस्तावेज संकलनासाठी वेळ मागितला होता. हे दस्तऐवज २९ जुलै रोजी ईडीने अनिल पवार, त्यांच्या नातेवाईक व निकटवर्तीयांच्या १२ ठिकाणी घेतलेल्या झडतीदरम्यान जप्त केलेल्या मालमत्तांशी संबंधित आहेत. या छाप्यांत पवार यांचे नाशिकस्थित पुतणे जनार्दन पवार यांच्या घरी १.३३ कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड सापडली होती. याशिवाय संपत्ती आणि आर्थिक व्यवहारांचे कागदपत्र, आरोप सिद्ध करणारे दस्तऐवज व डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली.
१ ऑगस्ट रोजी ईडीने अनिल पवार आणि त्यांच्या पत्नी भारती पवार यांना दुसरा समन्स पाठवून त्यांना सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले होते. जेणेकरून त्यांचे जबाब नोंदवता येतील आणि चौकशीसाठी आवश्यक कागदपत्रे सादर करता येतील.
ईडीचे अधिकाऱ्यांना पवार यांचे पुतणे जनार्दन पवार यांच्या नाशिकमधील घरी आढळलेल्या १.३३ कोटी रुपयांच्या बेहिशेबी रोख रकमेच्या स्रोताबाबत विचारणा करत आहेत. पवार यांचा जबाब नोंदवण्यात आला असून, ईडीच्या प्राथमिक निष्कर्षानुसार ही रोकड माजी आयुक्तांशी संबंधित असण्याची शक्यता आहे.
ईडीने २९ जुलै रोजी पवार, त्यांचे नातेवाईक आणि जवळचे सहकारी यांच्या १२ ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले होते. त्या दरम्यान जप्त केलेली कागदपत्रे व डिजिटल पुराव्यांची सखोल तपासणी सुरू आहे. या छाप्यांमध्ये बेकायदेशीर संपत्ती, आर्थिक देवाणघेवाण व वसई-विरार परिसरातील अनधिकृत भूविकासात सामील असलेल्या टोळीशी संबंध तपासले जात आहेत.
ईडीच्या अधिकाऱ्यांनुसार, या कंपन्यांचा वापर संपत्ती व निधी हस्तांतरणासाठी मोठ्या प्रमाणावर झाला असावा. पवार यांनी आपल्या कार्यकाळात या कंपन्या कुटुंबीय, नातेवाईक व बनावट नावे वापरून स्थापन केल्याचा संशय आहे.
पवार यांच्या पत्नी भारती पवार यांनीदेखील सोमवारी १० तासांहून अधिक काळ आपला जबाब नोंदवला. ईडी त्यांच्या नावावर अथवा त्यांच्या नियंत्रणात असलेल्या संपत्ती किंवा संस्थांची चौकशी करत आहे. स्रोतांच्या माहितीनुसार, ईडीने पवार दांपत्याच्या मुलींनाही या आठवड्यात चौकशीसाठी समन्स बजावले आहेत.
लाचखोरीची रक्कम फिरवायला कंपन्यांचा वापर
ईडीकडून अनिल पवार यांचे नातेवाईक व निकटवर्तीयांनी चालवलेल्या बनावट कंपन्यांचीही चौकशी सुरू आहे. या कंपन्यांनी निवासी पुनर्विकास प्रकल्प आणि गोदाम बांधकामांसारख्या कामांमध्ये सहभाग घेतल्याचे समोर आले असून, लाचखोरीतून मिळालेली रक्कम फिरवण्यासाठी या कंपन्यांचा वापर झाला असावा, असा ईडीचा संशय आहे.