वसई-विरारमध्ये महापौर­-उपमहापौरपदासाठी चुरस; महापौरपदासाठी बविआचे तीन, भाजपचा एक उमेदवार रिंगणात

वसई-विरार शहर मनपाच्या महापौरपदासाठी बहुजन विकास आघाडीच्या (बविआ) तीन नगरसेवकांनी तर भाजपच्या एका नगरसेवकाने नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. उप-महापौरपदाच्या निवडणुकीसाठी बविआकडून दोन आणि भाजपकडून एका नगरसेवकाने अर्ज सादर केला आहे.
वसई-विरारमध्ये महापौर­-उपमहापौरपदासाठी चुरस; महापौरपदासाठी बविआचे तीन, भाजपचा एक उमेदवार रिंगणात
Published on

वसई : वसई-विरार शहर मनपाच्या महापौरपदासाठी बहुजन विकास आघाडीच्या (बविआ) तीन नगरसेवकांनी तर भाजपच्या एका नगरसेवकाने नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. उप-महापौरपदाच्या निवडणुकीसाठी बविआकडून दोन आणि भाजपकडून एका नगरसेवकाने अर्ज सादर केला आहे.

महापौर व उपमहापौरपदाची निवड करण्यासाठी वसई-विरार शहर महानगरपालिकेची विशेष बैठक मंगळवार, दि. ३ फेब्रुवारी रोजी दुपारी १.०० वाजता महानगरपालिका मुख्यालयातील सर्वसाधारण सभागृह, ४ था मजला, यशवंत नगर, विरार (प.) येथे होणार आहे.

वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीत एकूण ११५ पैकी ६६ जागा जिंकून बहुजन विकास आघाडी हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. ही निवडणूक बविआने काँग्रेस आणि मनसे यांना सोबत घेऊन संयुक्त आघाडी म्हणून लढवली होती. त्यामध्ये काँग्रेसला ४ तर मनसेला १ जागा मिळाली. अशा प्रकारे बविआ आणि मित्रपक्षांना मिळून एकूण ७१ जागा मिळाल्या आहेत. दुसरीकडे, भाजपला ४३ जागा मिळाल्या असून त्यांच्या मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला १ जागा मिळाली आहे. त्यामुळे महायुतीकडे एकूण ४४ जागा आहेत.

महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांनी ३० जानेवारी रोजी नामनिर्देशनपत्र सादर केली. बविआच्या वतीने महापौरपदासाठी अजीव यशवंत पाटील, प्रफुल्ल जगन्नाथ साने आणि निशाद अरुण चोरघे यांनी अर्ज दाखल केले आहेत. तर भाजपच्या वतीने ॲड. दर्शना त्रिपाठी-कोटक यांनी उमेदवारी अर्ज सादर केला आहे. उपमहापौर पदासाठी बविआकडून मार्शल डॉमनिक लोपीस आणि कन्हैया (बेटा) मनोहर भोईर यांनी अर्ज दाखल केले आहेत. तर भाजपकडून नारायण सुरेश मांजरेकर यांनी उमेदवारी अर्ज सादर केला आहे.

३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष बैठकीत नामनिर्देशनपत्रांची छाननी, वैध उमेदवारांची यादी जाहीर करणे, नामनिर्देशन मागे घेण्याची प्रक्रिया, अंतिम उमेदवारांची घोषणा आणि आवश्यकता भासल्यास हात वर करून मतदान या सर्व प्रक्रिया पार पाडल्या जाणार आहेत. मतदानानंतर उमेदवारांना समान मते मिळाल्यास चिठ्ठीद्वारे सोडत काढून निकाल निश्चित केला जाईल. निवडून आलेल्या महापौर व उपमहापौर यांची नावे पीठासीन अधिकाऱ्यांमार्फत अधिकृतरीत्या जाहीर केली जातील, अशी माहिती महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in