

वसई : वसई-विरार महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडीसाठी राज्य निवडणूक आयोगाने वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार ३० किंवा ३१ जानेवारीपासून प्रशासकीय राजवट संपुष्टात येईल आणि लोकनियुक्त कार्यकारी मंडळाच्या हाती महापालिकेचा कारभार जाणार आहे.
१५ जानेवारी रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने ११५ पैकी ७१ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे, तर भाजप-शिंदे महायुतीला ४४ जागा मिळाल्या आहेत. यानंतर २२ जानेवारी रोजी महापौरपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून वसई विरारचे महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे.
आरक्षण जाहीर झाल्यानंतर नवनिर्वाचित सदस्यांची पहिली बैठक बोलावण्यासाठीचा प्रस्ताव २३ जानेवारी रोजी विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला.
महापालिकेच्या बैठकीची तारीख पहिल्या २४-२५ जानेवारी दरम्यान निश्चित करून पीठासीन अधिकारी निश्चित केला जाईल आणि स्थानिक वर्तमानपत्रात त्याची सूचना प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर २७-२८ जानेवारी २०२६ रोजी महापौर व उपमहापौरपदासाठी इच्छुक उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र नगर सचिवांकडे सादर करायचे आहेत. अंतिम निवड गुप्त मतदानाद्वारे केली जाईल.