

मुंबई : दिवाळीच्या उत्साहात नियम धाब्यावर बसवून फटाके फोडणे आणि मोठ्या आवाजात डीजे वाजवण्याचे प्रकार आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत. मुंबईपाठोपाठ वसई-विरार आणि मिरा-भाईंदर परिसरात दिवाळीदरम्यान २०० हून अधिक ठिकाणी आगीच्या घटना घडल्याने प्रशासनासमोर सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच फटाक्यांमुळे होणारे वायू आणि ध्वनी प्रदूषणही वाढले आहे. या पार्श्वभूमीवर अखेर पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेत फटाके, विनापरवाना डीजे आणि डोळ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या लेझर लाईट्सवर निर्बंध लागू केले आहेत.
सोमवारी सायंकाळी वसई-विरार आणि मिरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयाकडून यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले. पोलीस उपआयुक्त संजयकुमार पाटील यांनी सर्व पोलीस ठाण्यांना न्यायालयाच्या आदेशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत
पोलिसांची गस्त
याशिवाय गर्दीची ठिकाणे, निवासी परिसर आणि संवेदनशील भागांत पोलीस अधिकारी डेसिबल मीटरच्या मदतीने तपासणी व गस्त घालणार आहेत. वाहनचालक आणि नागरिकांच्या डोळ्यांना त्रास होईल अशा तीव्र लेझर आणि बीम लाईट्सवरही कारवाई केली जाणार आहे. नागरिक किंवा संस्थांकडून तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचण्याचे आदेश देण्यात आले आहेत.