

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिका स्थायी समिती सभापतीची निवड ५ मार्च २०२६ रोजी होणार आहे. महापालिकेच्या आर्थिक नाड्या आणि तिजोरीची चावी स्थायी समिती सभापतीच्या हाती असल्यामुळे या पदाच्या निवडीकडे राजकीय वर्तुळासह नागरिकांचे लक्ष लागले आहे.
नुकत्याच स्थापन झालेल्या १६ सदस्यीय स्थायी समितीत बविआचे १० तर भाजपचे ६ नगरसेवक सदस्य म्हणून निवडले गेले आहेत. या १६ सदस्यांमधून खुल्या मतदान पद्धतीने सभापतीची निवड करण्यात येणार आहे.
महानगरपालिका स्थायी समिती सदस्यांमधून सभापतीची निवड करण्यात येणार असून ५ मार्च रोजी पीठासन अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. २७ फेब्रुवारी रोजी महापालिका मुख्यालयातील नगरसचिव कार्यालयात नगरसचिव विश्वनाथ तळेकर यांच्याकडे बविआतर्फे स्थायी समिती सदस्य तथा माजी महापौर प्रवीण शेट्टी यांनी सभापती पदासाठी अर्ज दाखल केला. तर भाजपकडून स्थायी समिती सदस्य निलेश चौधरी यांनी सभापतीपदासाठी आपले नामनिर्देशनपत्र सादर केले आहे.