

वसई : दिवाळी संपते न संपते तोच वसई-विरारकरांना वेध लागतात नाताळचे! गोव्यानंतर पोर्तुगीज वसईत आले. त्यामुळे पालघर, ठाण्याच्या किनारपट्टीवर ख्रिस्ती समाज मोठया संख्येने आहे. त्यामुळे देशांत गोव्याच्या खालोखल या सणाला भर्ती येते वसईत! २५ डिसेंबर, अर्थात प्रभू येशूचा जन्म दिवस नाताळ म्हणून साजरा होत असला तरी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या रविवार पासूनच या सणाचा आगमन काळ सुरू होतो. या महिन्यातील सर्व चारही रविवारी सर्व चर्चेस मधून वेग वेगळी मेणबत्ती प्रज्वलित करून, विधी साजरा केला जातो. १ डिसेंबरच्या पहिल्या रविवारी प्रभू येशूच्या आगमनाची वर्दी देणाऱ्या जांभळ्या रंगाची मेणबत्ती लावण्यात आली.
वसई धर्मग्रामातील सर्वच चर्चेस मधून रविवारी असे विधी साजरे झालेत. सांडोर चर्चमध्ये लहान मुलांनी मेणबत्ती लावून आगमन काळाचे उद्घाटन केले. नाताळच्या चार आठवडे आधी हा विधी साजरा केला जातो. आगमनकाळाच्या पहिल्या रविवारी चर्चमध्ये एक चक्र लावण्यात येते. ते हिरव्यागार पानांनी, डहाळ्यांनी सुशोभित केले जाते. हिरवा रंग हा शाश्वताचा प्रतीक आहे. पहिल्या रविवारी संदेष्ट्याची जांभळी मेणबत्ती लावली जाते. कारण या दिवशी पहिले वाचन संदेष्ट्याच्या ग्रंथातून घेतलेले असते. ते आशेचे प्रतीक आहे.
मेणबत्ती स्वतः जळून इतरांना प्रकाश देते, तसेच समाजातील प्रत्येक व्यक्तीने त्यातून बोध घेऊन इतरांसाठी जगण्याच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. ही मेणबत्ती म्हणजे प्रभू येशूचा प्रकाश, नकारात्मक विचारांनी व्यापलेल्या भवतालात सकारात्मक प्रकाशाची दिशा आहे, असेही आगमन काळातील मेणबत्तीचे महत्त्व आहे.
दुसऱ्या रविवारी बेथलेहेमची मेणबत्ती लावली जाते. ती नाताळ गुहेची आठवण करून देते. ती प्रीतीचे प्रतीक आहे. तिसऱ्या रविवारी मेंढपाळाची मेणबत्ती लावली जाते. ती आनंदाचे प्रतीक आहे. ही मेणबत्ती गुलाबी रंगाची असते.
जांभळा रंग आशेचे प्रतीक
ख्रिस्ती श्रद्धेनुसार जांभळा रंग हा आशेचा रंग आहे. प्रभू येशू ख्रिस्त मानवाच्या कल्याणासाठी पृथ्वीवर येत आहे, ही आशा या मेणबत्तीच्या प्रज्वलनाने जागवली जाते. येशूजन्माच्या सातशे वर्षे आधी यशया या संदेष्ट्याने येशूच्या जन्माचे भाकीत करून तत्कालीन लोकांना पापमुक्ती आणि तारणाची आशा दिली होती. त्याचेही प्रतीक म्हणून जांभळ्या रंगाची मेणबत्ती प्रज्वलित केली जाते.
प्रभू येशूचा जन्म उत्सव म्हणजे आमच्या आयुष्यात आनंद फुलवणारी सर्वात पवित्र घटना! वसईतील सामाजिक वातावरण पूर्वंपार सर्वधर्मसमभावाचे असल्यामुळे नाताळ सण हा केवळ ख्रिस्ती धर्मियांचा न राहता, त्याचा उत्सव सर्व धर्मियांसाठी पर्वणी असतो. गणेशोत्सव अथवा दसरा-दिवाळी जशी आम्हालाही आपली वाटते. तसेच हिंदू व अन्य धर्मीय नागरिक आमच्या सोबत येऊन एकोप्याने नाताळचा आनंद लुटतात.
- प्रेसीला डिसोजा , ख्रिस्ती भाविक, रमेदी