

मुंबई : राज्यात व्यावसायिक प्रवासी वाहने चालविणाऱ्या चालकांना व्यावहारिक मराठी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य करण्यात आले आहे. याबाबत करण्यात आलेल्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मोटार परिवहन विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे.
या बैठकीत सुधारित नियमांची अंमलबजावणी, चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी तसेच त्यासाठीची कार्यपद्धती याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात ऑटोरिक्षा आणि टॅक्सी संवर्गातील एकूण ९ लाख ७८ हजार ५४१ वैध परवाने आहेत. यामध्ये ९ लाख १६ हजार ८८४ ऑटोरिक्षा आणि ६१ हजार ६५७ टॅक्सी परवान्यांचा समावेश आहे. मुंबई महानगर क्षेत्रातच सुमारे ४ लाख ६२ हजार ३८७ रिक्षा आणि टॅक्सी परवानाधारक आहेत. व्यावसायिक वाहनचालक दररोज हजारो प्रवाशांशी थेट संवाद साधत असतो. त्यामुळे प्रवासी आणि चालक यांच्यात सुसंवाद निर्माण होण्यासाठी चालकांना व्यवहारिक मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. अनेक अमराठी चालकांना मराठीचे पुरेसे ज्ञान नसल्याने सुधारित नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच त्यांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी करणेही महत्त्वाचे ठरणार आहे.
चालकांना अद्याप व्यावहारिक मराठीचे पुरेसे ज्ञान नाही
राज्यात ऑटोरिक्षा आणि टॅक्सी संवर्गातील ९ लाख ७८ हजारांहून अधिक वैध परवाने आहेत. त्यापैकी १ लाख ६५ हजारांहून अधिक चालकांनी मराठी भाषा शिकण्यासाठी या अभियानात सहभाग नोंदविला आहे. उर्वरित अनेक चालकांना अद्याप व्यावहारिक मराठीचे पुरेसे ज्ञान नाही. अशा चालकांनी मराठी भाषा शिकण्याची इच्छा व्यक्त केल्यास त्यांना यापुढेही मराठी भाषा विभागाकडून सहकार्य केले जाणार आहे.
लाखो अमराठी चालकांबाबत बैठक
नवीन नियमावलीनुसार व्यावहारिक मराठीचे ज्ञान नसलेल्या चालकांची संख्या मोठी आहे. परिवहन विभागाने माणुसकीच्या दृष्टिकोनातून १०५ दिवस ‘मराठी शिका’ हे अभियान राबविले. मात्र, आता कारवाईच्या कक्षेत येणाऱ्या उर्वरित अमराठी चालकांच्या बाबतीत नियमांची अंमलबजावणी कोणत्या पद्धतीने करावी, याबाबत बुधवारी होणाऱ्या बैठकीत सविस्तर चर्चा केली जाणार आहे.