मुंबई : पर्यावरणाची हानी होण्यास अनेक कारणे असली, तरी त्यापैकी वाहनांची वाढती संख्या एक मुख्य कारण आहे. मुंबईत २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये वाहनांच्या संख्येत ५.९८ टक्के वाढ ही वायू प्रदूषण व वाहतूककोंडीची मोठी समस्या निर्माण करणारी असल्याचे पालिकेच्या वार्षिक पर्यावरण रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे.
मुंबईला स्वच्छ-सुंदर आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी महापालिकेतर्फे सन २०२१-२२ या वर्षापासून इलेक्ट्रिक वाहन धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली आहे. सिनेमागृहे, पेट्रोल पंप आणि महापालिकेच्या वाहन तळाजवळ १० इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन स्थापन करण्यात आलेली असून १० इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन प्रस्तावित आहेत. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करा, पालिकेच्या आवाहनाला मुंबईकरांचा प्रतिसाद मिळत असून वाढत्या प्रतिसादामुळे वायू प्रदूषण नियंत्रित करण्यात पालिकेला यश येईल, असा वार्षिक पर्यावरण रिपोर्टमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, बेस्ट उपक्रमाने पर्यावरणाच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला असून २०२५-२६ शंभर टक्के बसेस इलेक्ट्रिक असतील, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत अति प्रमाणात साधनसंपदा वापरून मानवच प्रदूषणाचे डोंगर उभारत आहे. यामुळे जैवविविधता धोक्यात आली असून निसर्गाची रचना बदलत आहे. याची परतफेड म्हणून पर्यावरणात असमतोल निर्माण होऊन अवकाळी पाऊस, ऋतुमानात होणारे अचानक बदल, चक्रीवादळे, भूकंपाचे हादरे, अति तापमान, अति पर्जन्यवृष्टी या नैसर्गिक आपत्तींना आपल्याला सामोरे जावे लागत आहे.
हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा बचत करणे, सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचा वापर करणे, वृक्षारोपण मोहीम राबविणे, प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करणे, वस्तूंचा पुनर्वापर करण्यास आग्रह धरणे, प्रदूषणमुक्त परिसर ठेवणे अशा साध्या आणि सहज करता येणाऱ्या उपाययोजनांबाबत मुंबईकरांमध्ये जागरूकता निर्माण होईल, असा विश्वास पर्यावरणाच्या वार्षिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.
'अशी' झाली वाहनांच्या संख्येत वाढ
वर्ष - वाहनांची संख्या
२०२३ - ४५,३७,२११
२०२२ - ४२,८१,२५१
२०२१ - ४०, ३३,४९७
मियावाकी वन उभारणीवर भर
पर्यावरणाच्या संवर्धनासाठी झाडांची लागवड करणे काळाची गरज असून, यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. मुंबई महापालिकेच्या माध्यमातून मियावाकी वन उभारणीवर भर दिला असून, आतापर्यंत चार लाख मियावाकी जंगल अस्तित्वात आणल्याचे रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.