मुंबई : प्रेमसंबंधातून गर्भवती राहिलेल्या १९ वर्षांच्या गर्भवती विद्यार्थीनीच्या २७ आठवड्यांच्या गर्भपाताला परवानगी मागणाऱ्या याचिकेचा फैसला मुंबई हायकोर्टाने ३० मेपर्यंत राखून ठेवला आहे. न्यायमूर्ती नितीन बोरकर आणि न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांच्या खंडपीठाने ससून हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या वैद्यकीय मंडळाचा अहवाल आणि याचिकाकर्त्या मुलीबरोबरच तिच्या आईवडिलांशी चेंबरमध्ये संवाद साधल्यानंतर निर्णय राखून ठेवला. तो गुरुवारी देण्याची शक्यता आहे.
प्रेमसंबधातून अवघ्या १९ वर्षी विद्यार्थीनीने आपल्या बॉयफ्रेंडसोबत शारीरिक संबंध ठेवल्याने ती गर्भवती राहिली. ही बाब तिच्या आईला समजली, त्यावेळी ती २५ आठवड्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले. गरोदरपणाचे परिणाम स्वत:वर आणि गर्भातील बाळावर होऊ शकतात. मला पुढील शिक्षण घ्यायचे असल्याने नियमानुसार २० आठवड्यानंतर गर्भपात करण्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असल्याने गर्भपाताची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका मुलीने मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे.
या याचिकेवर मागील सुनावणीच्यावेळी न्यायमूती नितीन बोरकर व न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांच्या खंडपीठाने पुण्याच्या ससून हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या वैद्यकीय मंडळाला मुलीची वैद्यकीय तपासणी करून तातडीने अहवाल देण्याचे आदेश दिले होते. बुधवारी सुनावणीवेळी वैद्यकीय अहवाल सादर करण्यात आला.