वर्सोवा-दहिसर कोस्टल रोड प्रकल्प

११ कंपन्यांचा प्रतिसाद ; १६ हजार ६२१ कोटी खर्च होणार
वर्सोवा-दहिसर कोस्टल रोड प्रकल्प

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आता वर्सोवा ते दहिसर कोस्टल रोड प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाला पालिका प्रशासनाने मंजुरी दिली असून, या कामासाठी ११ कंपन्यांनी निविदांना प्रतिसाद दिला आहे.

दरम्यान, यात एल अँड टी, जे कुमार आणि ट्रान्स रेलसह एचसीसी सारख्या कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. पालिका प्रशासनाने वर्सोवा-दहिसर समुद्र मार्गाचे काम ६ टप्प्यात पूर्ण करण्याचा निर्णय घेतला असून, ज्यावर सुमारे १६ हजार ६२१ कोटी रुपये खर्च होणार आहेत.

मुंबई महापालिकेच्या प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी-लिंक समुद्र मार्गाचे बांधकाम सुरू आहे. वांद्रे सी-लिंक ते वर्सोवापर्यंत समुद्र मार्ग बांधण्याची जबाबदारी राज्य सरकारने घेतली आहे, तर वर्सोवा ते दहिसरपर्यंत समुद्र मार्ग बांधण्याची जबाबदारी आता महापालिकेवर सोपवण्यात आली आहे. वर्सोवा - दहिसर समुद्र मार्ग करण्यासाठी पालिका प्रशासनाने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. पालिका मुख्यालयात समुद्र मार्ग बांधण्यासाठी शुक्रवारी उत्सुक सहभागी कंपन्यांची बैठक झाली. या बैठकीत एल अँड टी, जे कुमार, ट्रान्स, एच सीसी, एस सी सी, दिनेश चंद्र अग्रवाल, आय डी डी सह एकूण ११ कंपन्या सामील झाल्या. यावेळी मनपा अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू यांच्यासमोर सादरीकरण केले गेले. वर्सोवा ते दहिसर दरम्यान २२ किमी अंतराचा समुद्र मार्ग आहे. या कोस्टल रोडच्या कामासाठी सुमारे १६ हजार ६२१ कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे. कोस्टल रोड ६ टप्प्यात बांधण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in