मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परळ भागाचे माजी संघचालक व अमल विद्यावर्धिनी, मुंबईचे अध्यक्ष चंद्रकांत श्रीधर चव्हाण (७८) यांचे ०७ फेब्रुवारी रोजी रात्री ११.३० वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. परळ भोईवाडा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. लालबाग नगरातील संघ स्वयंसेवकांसाठी ते त्यांचे आधारस्तंभ, लाडके शिक्षक व उत्तम मार्गदर्शक होते. मुंबई महानगर बौद्धिक प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. विद्यार्थी परिषदचेही ते कार्यकर्ता होते. तसेच राजापूर तालुक्यातील वाटूळ गावाच्या विकासासाठी ते विशेष कार्यरत होते. त्यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर गाढा अभ्यास होता; त्यावर अनेक ठिकाणी त्यांनी व्याख्यानही दिले होते. रसायन शास्त्राची बीएससीची पदवी हाती घेतल्यानंतर हायको प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत संशोधन अधिकारी म्हणून त्यांनी नोकरी केली होती. तसेच त्यांनी परळ विभाग 'नाना पालकर स्मृती समिती'च्या रुग्णसेवा सदनाचे व्यवस्थापक म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी, नातू, जावई असा त्यांचा परिवार आहे.