
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलावरून ऑइल वाहून नेणारा टँकर रविवारी (दि.३०) संध्याकाळी थेट रस्त्यावर कोसळला. या भीषण अपघातात चालकाचा मृत्यू झाला. सुदैवाने टँकर कोसळला तेव्हा खालील रस्त्यावर अन्य वाहन अथवा नागरिक नसल्याने मोठा अनर्थ टळला. या भीषण अपघाताचा व्हिडिओही समोर आला आहे.
माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास मुंबईहून गुजरातच्या दिशेने निघालेला टँकर मस्तान नाका उड्डाणपूलावर अनियंत्रित होऊन आधी कठड्याला धडकला आणि नंतर थेट पंधरा ते वीस फूट खाली रस्त्यावर कोसळला. लगेचच टँकरला आग लागली. त्यानंतर रस्त्यावर काहीसा गोंधळ उडाला आणि लोक घाबरुन पळू लागले.
माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि तातडीने ग्रामस्थांच्या मदतीने केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला मनोर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तथापि, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघातानंतर टँकरमधून तेलाची गळती सुरू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. खबरदारी म्हणून पोलिसांनी परिसर निर्मनूष्य केला आणि वाहतूकही बंद केली होती.
मात्र, तेल ज्वलनशील नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर टँकर बाजूला करुन वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.