Video : कोविड काळातील आठ सिलेंडरचा स्फोट, काळाचौकी परिसरातील शाळेला भीषण आग
मुंबईतील काळाचौकी परिसरातील मुंबई महानगरपालिकेच्या बंद पडलेल्या शाळेत तब्बल ८ ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला. या ऑक्सिजन सिलेंडरच्या स्फोटामुळे भीषण आग लागली होती. तब्बल ७ ते ८ ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला. त्या स्फोटाने आजूबाजूच्या परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. आगीची बातमी मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी कसेबसे आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
कोविड काळातल्या सिलेंडरमुळे लागली आग -
बीएमसीच्या साईबाबा पथ मुंबई पब्लिक स्कूलमध्ये आग ही लागली होती. या शाळेचा वापर कोविडमध्ये केला गेला होता. त्यानंतर ही शाळा बंदच होती. मात्र त्या काळात वापरले गेलेले ऑक्सिजन सिलेंडर तसेच पडून होते. सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे आगीने आतमध्ये असलेल्या गाद्यांनी पेट घेतला आणि आग लगेचच पसरली.
लसीकरण केंद्रासाठी शाळेचा वापर-
मुंबईतील बीएमसीची ही शाळा तीन चार वर्षांपासून बंद होती. या शाळेतील विद्यार्थी इतर विभागात पाठवले गेले होते. त्यानंतर ही शाळा तोडण्याचे काम सुरू केले होते. परंतु काही दिवसानंतर तोडण्याचे काम बंद करण्यात आले. कोविड काळात लसीकरण केंद्र म्हणून या शाळेचा वापर करण्यात आला होता, असे ठाकरे गटाचे पदाधिकारी अनिल कोळी यांनी सांगितले.