

मुंबई : मुंबईत काय घडतंय यावर लक्ष ठेवण्यासाठी आपत्कालीन नियंत्रण कक्षात उभारलेल्या व्हिडीओ वॉलची दुरवस्था झाली असून ती कधीही पडेल, अशी स्थिती आहे. मुंबईतील विविध ठिकाणांवर लक्ष ठेवण्यासाठी व्हिडीओ वॉल मोठी असावी यासाठी कंत्राटदाराच्या माध्यमातून काम करण्यात येणार आहे. मात्र काळ्या यादीतील कंत्राटदाराला काम कसे दिले जाते, ठराविक कंपन्यांना काम देण्यासाठी प्रस्ताव आणला जातो का, असा सवाल उपस्थित करत प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्यात यावा, अशी उपसूचना सभागृह नेते गणेश खणकर यांनी मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मांडली. खणकर यांनी केलेल्या आरोपांवर सदस्यांनी मते व्यक्त केली. अखेर सदस्यांचा रोष लक्षात घेता सुधारित प्रस्ताव सादर करा, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिले.
मुंबईतील सर्व ठिकाणांवर एकाच वेळी लक्ष ठेवण्यात येणाऱ्या महापालिका आपत्कालिन नियंत्रण कक्षातील व्हिडीओ वॉल ही जुनी झाली असून या वॉलची दैनंदिन देखभालही आता बंद झाल्याने ही वॉल केव्हाही कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे महापालिकेच्यावतीने पावसाळ्या आधी ही व्हिडीओ वॉल न बसवल्यास येणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत मुंबईत घडणाऱ्या
आपत्कालीन परिस्थितीची माहिती घेणे कठीण होणार आहे. पावसाळ्यात आपत्कालीन घटना घडली की आपत्कालीन नियंत्रण कक्षात तातडीने दखल घेतली जाते. मात्र काळ्या यादीतील कंत्राटदाराला काम देण्याचा घाट प्रशासनाकडून घातला जातोय म्हणजे काळ्या यादीतील कंत्राटदाराला लाभ मिळावा म्हणून, असा आरोप सदस्य प्रिती सातम यांनी यावेळी केला.
मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील मुख्य नियंत्रण कक्ष आणि परळ येथील पर्यायी नियंत्रण कक्ष येथे सन २०१६ मध्ये व्हिडीओ वॉल बसवण्यात आली होती. या व्हिडीओ वॉलवर उपलब्ध असणारे सी सी टिव्ही कॅमेरांद्वारे आपत्ती प्रसंगी मुख्य नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवले जाते. मुंबईतील सुमारे ९ हजार ७०० कॅमेरांचे प्रक्षेण या व्हिडीओ वॉलवर उपलब्ध असून एकाच वेळी ५० ते ६० कॅमेरांचे प्रक्षेपण एकाच वेळेस व्हिडीओ वॉलवर उपलब्ध होते.
या कॅमे-यांच्या प्रक्षेपणासहित व्हिडीओ बॉलवर भारतीय हवामान खात्याचे संकेतस्थळ, डॉपलर रडार, आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे संकेतस्थळ, महानगरपालिकेची भौगोलिक माहिती प्रणालीवर आधारीत नियंत्रण आणि समादेशन प्रणाली, पावसाळ्यात पर्जन्य जलवाहिनी विभागामार्फत विविध ठिकाणी बसवलेले पंप यावर देखरेख ठेवणे, त्यांची सद्यस्थिती आदी बाबींचे प्रक्षेपण एकाचवेळी व्हिडीओ वॉलवर उपलब्ध झाल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षमपणे करणे शक्य होते. मात्र पावसाळा तोंडावर आला असून २२ टक्के कमी दराने काम देण्याचा हा प्रस्ताव आहे. कंत्राटदार काय पुरवठा करणार याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते आश्रफ आजमी यांनी यावेळी केली.
दरम्यान, स्थायी समिती सदस्यांचा आक्षेप काळ्या यादीतील कंत्राटदाराला काम देण्याचा घाट घातला जातोय हे योग्य नाही, असे सांगत सुधारित प्रस्ताव सादर करा असे निर्देश शिंदे यांनी दिले.