विद्युत दाहिनीचे धोरणच कागदावर! पर्यावरण संवर्धनाला बगल

विद्युत दाहिनीचे धोरणच कागदावर! पर्यावरण संवर्धनाला बगल

मुंबईतील हवेतील गुणवत्ता खालावली असून गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रदूषणाचा स्तर कमी झाला आहे.

गिरीश चित्रे/मुंबई : एकीकडे वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळल्यामुळे मुंबई हायकोर्टाने बृहन्मुंबई महापालिकेसह सर्वांचेच कान उपटले आहेत. त्यातच लाकडाचा कमीत कमी वापर करत पर्यावरणाच्या रक्षणासाठी मुंबईतील स्मशानभूमीत विद्युत व पीएनजी दाहिनी करण्यावर भर दिला जात आहे. मात्र प्रत्यक्षात विद्युत दाहिनी करण्याचे धोरणच अस्तित्वात नसल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाची ओरड करणाऱ्या मुंबई महापालिकेकडूनच पर्यावरण संवर्धनाला बगल दिली जात आहे.

मुंबईतील हवेतील गुणवत्ता खालावली असून गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रदूषणाचा स्तर कमी झाला आहे. वाढत्या प्रदूषणाला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने प्रदूषणकारी प्रकल्प ठिकाणी २७ प्रकारची नियमावली जारी केली. तसेच प्रदूषणकारी टायर स्मशानभूमीत जाळण्यावर बंदी घालण्यात आली. मात्र आजही स्मशानभूमीत मृतदेह जाळण्यासाठी टायरचा वापर केला जातो, तर दुसरीकडे लाकडाचाही मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असून एक मृतदेह जाळण्यासाठी तब्बल ३०० किलो लाकडाचा वापर केला जातो. लाकडाचा वापर कमी करत पर्यावरण संवर्धनासाठी विद्युत व पीएनजी दाहिनी बसवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. हिंदू, ख्रिश्चन व मुस्लीम समाजाच्या पालिकेच्या व खासगी मिळून मुंबईत एकूण १९६ स्मशानभूमी आहेत. मात्र यापैकी फक्त १८ ठिकाणी विद्युत, तर ३० पीएनजी गॅस दाहिनी कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. परंतु प्रत्यक्षात विद्युत दाहिनी करण्याचे धोरणच अस्तित्वात नसल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. विद्युत दाहिनीला काही लोकांचा विरोध आहे, परंतु पर्यावरण संवर्धनासाठी विद्युत दाहिनी गरजेची आहे. त्यामुळे विद्युत दाहिनी करण्यासाठी पालिकेला ठोस धोरण निश्चित करणे गरजेचे आहे, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

लोकांना प्रोत्साहित करणार

प्रत्येक समाजात अंत्यसंस्कार करण्याची पद्धत वेगवेगळी असते. त्यामुळे लोकांच्या भावना दुर्लक्षित करता येणार नाहीत. तरीही प्रत्येक स्मशानभूमीत विद्युत दाहिनी करण्यावर भर दिला जात आहे, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले.

एकूण स्मशानभूमी

पालिकेच्या - ७५

खासगी - १२१

एकूण - १९६

स्मशानभूमीचे प्रकार

विद्युत दाहिनी - १८

पीएनजी गॅस - ३०

लाकडाचा वापर

२४६ स्मशानभूमीत लाकडाचा वापर होतो

एका मृतदेहासाठी ३०० किलो लाकडाचा वापर

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in