दिल्लीतील बहुचर्चित श्रद्धा हत्याकांडाचा तपास सुरू असून, हा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. श्रद्धा वालकर खून प्रकरणात तिच्या वडिलांनी आज पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी त्यांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी आफताब पूनावालाला कठोर शिक्षा करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
काय म्हणाले श्रद्धाचे वडील ?
विकास वालकर म्हणाले श्रद्धाच्या अशा जाण्याने आम्ही खूप दुःखी आहोत. यावेळी दिल्लीच्या राज्यपालांनी मला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. तपासात दिल्ली पोलिस आणि वसई पोलिसांचे संयुक्त काम आतापर्यंत चांगलेच झाले आहे. मात्र सुरुवातीला वसईतील तुळींज पोलीस ठाण्याच्या काही असहकार वृत्तीमुळे मला खूप त्रास सहन करावा लागला. त्याची चौकशी व्हायला हवी, तसे झाले नसते तर आज माझी मुलगी जिवंत असती, किंवा काही पुरावे मिळण्यास मदत झाली असती, असे विकास वालकर यांनी सांगितले. तसेच म्हणाले की, आफताब पूनावालाला कठोर शिक्षा झाली पाहिजे, आफताबच्या कुटुंबीयांचीही चौकशी करून त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे. या कटात सहभागी असलेल्यांची चौकशी करून त्यांना शिक्षा झाली पाहिजे.