विक्रोळी उड्डाणपुलावर दुभाजक, जीपीएस यंत्रणेचा अभाव; प्रवाशांमध्ये अपघाताची भीती

विक्रोळी येथील लालबहादूर शास्त्री मार्गापासून पूर्व द्रुतगती मार्गाला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा ६१५ मीटरचा पूल मुंबई महानगरपालिकेने पाच वर्षांचा कालावधी घेऊन पूर्ण केला. यासाठी पालिकेने तब्बल १०४ कोटी रुपये खर्च करून १४ जून रोजी हा पूल वाहतुकीसाठी खुला केला. परंतु...
विक्रोळी उड्डाणपुलावर दुभाजक, जीपीएस यंत्रणेचा अभाव; प्रवाशांमध्ये अपघाताची भीती
Published on

पूनम पोळ/ मुंबई

विक्रोळी येथील लालबहादूर शास्त्री मार्गापासून पूर्व द्रुतगती मार्गाला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा ६१५ मीटरचा पूल मुंबई महानगरपालिकेने पाच वर्षांचा कालावधी घेऊन पूर्ण केला. यासाठी पालिकेने तब्बल १०४ कोटी रुपये खर्च करून १४ जून रोजी हा पूल वाहतुकीसाठी खुला केला. परंतु, उभारलेल्या या पुलावर दुभाजक बांधणे, जीपीएस यंत्रणा बसवणे तसेच हा पूल एक मार्गी आहे की दोन मार्गी याची माहिती पालिकेने स्पष्ट न दिल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच, कन्नमवारनगरहून टागोरनगरकडे जाताना वाहनचालक पुलावरूनच 'यू टर्न' घेऊन शॉर्टकटचा मार्ग अवलंबत असल्याने या ठिकाणी अपघाताचा धोका वाढला आहे.

विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळ फाटक असल्याने ते ओलांडून अनेक जण पूर्व-पश्चिम असा प्रवास करत होते. वाहनचालकही याच मार्गाला पसंती देत होते. फाटक ओलांडताना पादचारी, वाहनचालकांचे अनेक अपघात झाल्याने उड्डाणपूल उभारण्याची मागणी स्थानिकांमधून होऊ लागली. त्यानुसार एप्रिल २०१८ मध्ये मुंबई महापालिकेने या कामाचे कार्यादेश काढले. त्यानुसार मे २०१८ मध्ये पुलाच्या कामाला सुरुवात झाली. मात्र, जलद बांधकामासाठी पुलाच्या आराखड्यात अनेक बदल करण्यात आले. आयएस मानांकनाच्या नवीन प्रणालीमुळे आराखड्यात बदल करतानाच त्याच्या मंजुरी प्रक्रियेसही विलंब झाला आणि पुलाची रखडपट्टी सुरू झाली. साधारण २०२० च्या सुरुवातीला पुन्हा महत्त्वाच्या कामांना सुरुवात झाली. दरम्यान, कोरोना काळात कामाची गती मंदावली. मात्र गेल्या वर्ष-दीड वर्षाच्या कालावधीत पालिकेने कामांना वेग देत ही कामे विहित वेळेत पूर्ण केली. पूल बांधण्यासाठी एकूण १०४. ७७ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.

दरम्यान, पावसाळ्याच्या कालावधीमध्ये लालबहादूर शास्त्री मार्गावर बऱ्याच वेळा वाहतूककोंडी होते. नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. ही बाब विचारात घेता कोणत्याही अधिकृत समारंभाची वाट न पाहता हा पूल नागरिकांसाठी खुला करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आला. त्यानुसार पालिकेने १४ जूनपासून हा पूल वाहतुकीसाठी खुला केला. परंतु, वाहतूक यंत्रणेत महत्त्वाचे असलेले दुभाजक, जीपीएस यंत्रणा बसवण्यास पालिकेला विसर पडला आहे. तसेच दिशादर्शक फलकावर हा रस्ता एकमार्गी की दोनमार्गी आहे हा संभ्रम प्रवाशांमध्ये निर्माण झाला आहे.

logo
marathi.freepressjournal.in