विक्रोळी रेल्वे उड्डाणपूल आजपासून खुला होणार

रेल्वे फाटक ओलांडताना होणारे अपघात टाळण्यासाठी पाच वर्षांपूर्वी मुंबई महापालिका आणि रेल्वेच्या वतीने फाटक बंद करून विक्रोळी उड्डाणपुलाची उभारणी सुरू केली. पाच वर्षांनंतर विक्रोळी येथील लालबहादूर शास्त्री मार्गापासून पूर्वद्रुतगती मार्गाला जोडणारा ६१५ मीटरचा पूल मुंबई महानगरपालिकेने पूर्ण केला आहे, याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेचे अभिनंदन केले आहे.
विक्रोळी रेल्वे उड्डाणपूल आजपासून खुला होणार
Published on

मुंबई : रेल्वे फाटक ओलांडताना होणारे अपघात टाळण्यासाठी पाच वर्षांपूर्वी मुंबई महापालिका आणि रेल्वेच्या वतीने फाटक बंद करून विक्रोळी उड्डाणपुलाची उभारणी सुरू केली. पाच वर्षांनंतर विक्रोळी येथील लालबहादूर शास्त्री मार्गापासून पूर्वद्रुतगती मार्गाला जोडणारा ६१५ मीटरचा पूल मुंबई महानगरपालिकेने पूर्ण केला आहे, याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेचे अभिनंदन केले आहे.

हा पूल शनिवार, १४ जून २०२५ रोजी दुपारी ४ वाजेपासून वाहतुकीसाठी खुला करावा, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि पोलिसांना दिले आहेत. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याही सूचना आहेत. पावसाळ्याच्या कालावधीमध्ये लालबहादूर शास्त्री मार्गावर बऱ्याच वेळा वाहतूककोंडी होते, नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. ही बाब विचारात घेता पालिकेने कोणत्याही अधिकृत समारंभाची वाट न पाहता हा पूल नागरिकांसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला आहे.

सात साल बाद...

विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळ फाटक असल्याने ते ओलांडून अनेक जण पूर्व-पश्चिम असा प्रवास करत होते. वाहनचालकही याच मार्गाला पसंती देत होते. फाटक ओलांडताना पादचारी, वाहनचालकांचे अनेक अपघात झाल्याने उड्डाणपूल उभारण्याची मागणी स्थानिकांमधून होऊ लागली. त्यानुसार सात वर्षापूर्वी, एप्रिल २०१८ मध्ये मुंबई महापालिकेने कामाचे कार्यादेश काढले. मे २०१८ मध्ये पुलाच्या कामाला सुरुवात झाली. जलद बांधकामासाठी पुलाच्या आराखड्यात बदल करण्यात आले. आयएस मानांकनाच्या प्रणालीमुळे आराखड्यात बदल करत मंजुरी प्रक्रियेसही विलंब झाला. २०२० च्या सुरुवातीला पुन्हा महत्त्वाच्या कामांना सुरुवात झाली. कोरोनाकाळात कामाची गती मंदावली. मात्र गेल्या वर्ष - दीड वर्षाच्या कालावधीत पालिकेने या कामांना वेग देत हे काम विहित वेळेत पूर्ण केली आहे. पूल बांधण्यासाठी एकूण १०४.७७ कोटी रुपये त्यावर खर्च करण्यात आले आहे.

विक्रोळी पूल

  • लांबी : ६१५-मीटर, रुंदी १२ मीटर

  • सुधारित अंदाजे खर्च : १८० कोटी रुपये

  • काम वाढवले : मार्च २०२१, मे २०२२, ऑक्टोबर २०२२, मे २०२३

  • नवीन अंतिम मुदत: ३१ मे २०२५

logo
marathi.freepressjournal.in