पार्ल्यातील जैन मंदिर पाडकामाचे पडसाद; पालिका विभाग अधिकाऱ्याची बदली

मुंबई : विलेपार्ले परिसरातील एक जैन मंदिर पाडल्याच्या वादानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने शनिवारी सहाय्यक आयुक्ताची बदली केली.
पार्ल्यातील जैन मंदिर पाडकामाचे पडसाद; पालिका विभाग अधिकाऱ्याची बदली
Published on

मुंबई : विलेपार्ले परिसरातील एक जैन मंदिर पाडल्याच्या वादानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने शनिवारी सहाय्यक आयुक्ताची बदली केली.

जैन समाजाच्या सदस्यांनी यासंदर्भात शनिवारी सकाळी आंदोलन मिरवणूक काढली. के-ईस्ट वॉर्डचे प्रभारी नवनाथ घाडगे यांची तात्काळ बदली करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली.

१६ एप्रिल रोजी के-ईस्ट वॉर्डच्या टीमने नेमिनाथ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या आवारात असलेले एक जैन मंदिर किंवा 'चैत्यालय' अनधिकृत रचना असल्याच्या कारणावरून पाडले होते.

शनिवारी वॉर्ड कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. महाराष्ट्र गौशाला संघाचे परेश शाह यांनी सांगितले की, या मोर्चामध्ये २० हजारांहून अधिक लोक सहभागी झाले होते. यामध्ये धार्मिक नेते, राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा, स्थानिक भाजप आमदार पराग अळवणी आणि इतर काही राजकीय नेते सहभागी होते.

मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन सादर केले आणि घाडगे यांच्यासोबत दोन तासांची बैठक घेतली. पालिकेच्या या कृतीमुळे संपूर्ण जैन समाज व्यथित झाला आहे, असे सांगण्यात आले. संबंधित अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी करण्यात आली. मंदिर पाडण्यापूर्वी विश्वस्तांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली नव्हती, असा आरोप करण्यात आला. विरोधी काँग्रेस पक्षानेही या प्रकरणावरून पालिकेवर टीका केली.

‘आम्हाला न्याय हवाय...…’

मुंबई : महापालिकेने विलेपार्ले येथील ९० वर्षे जुने दिगंबर जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ हजारो जैन धर्मीयांनी शनिवारी अहिंसा रॅली काढली. यावेळी शांततापूर्ण निदर्शने करण्यात आली.

राज्याचे कौशल्य मंत्री मंगल प्रभात लोढा, विलेपार्लेचे आमदार पराग अळवणी, खासदार

वर्षा गायकवाड आणि घाटकोपरचे आमदार पराग शाह हेदेखील पालिकेच्या के-पूर्व वॉर्ड कार्यालयापर्यंतच्या रॅलीत सामील झाले.

पालिकेने जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ निदर्शने करताना निदर्शकांनी “आम्ही जैन आहोत, आम्ही थांबणार नाही, आम्ही आता हार मानणार नाही”, असे लिहिलेले बॅनर हातात घेतले होते. ९० वर्षे जुन्या मंदिराचे रक्षण करण्यासाठी एकता आणि दृढनिश्चय दाखवत विलेपार्ले येथे मोठा जमाव जमला.

मनपाच्या कर्मचाऱ्यांवर धार्मिक वस्तूंची गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामध्ये जैन समुदायाचे पवित्र ग्रंथ आणि वस्तू असल्याचा दावा आहे. जैन समुदायाच्या सदस्यांच्या मते, पालिकेने जेसीबी मशीन वापरून तोडफोड सुरू केली.

पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जैन धर्मीयांची विनंती मान्य केल्यानंतर निदर्शने संपली. पालिकेने तोडमोहीम थांबविण्याचे आश्वासन दिल्याने निदर्शने थांबली.

काँग्रेसचे नेते पवन खेडा यांनी ‘एक्स’वर लिहिले की, पालिकेने ९० वर्षे जुने दिगंबर जैन मंदिर कोणतीही सुनावणी न करता पाडल्यामुळे जैन समाज दुखावला गेला आहे. देशातील सहिष्णुता आणि सौहार्द यांच्याशी भाजपचा नेमका काय वैर आहे, असा प्रश्न खेडा यांनी उपस्थित केला.

logo
marathi.freepressjournal.in