Mumbai : विलेपार्लेत अग्नितांडव! मुलासह महिलेचा मृत्यू; सहाजण जखमी

एक हलगर्जीपणा कुटुंबासाठी काळरात्र ठरली. कपड्यांना इस्त्री करून बाहेर पडताना उपकरणाचा वीजपुरवठा बंद करण्यास विसरल्याने विलेपार्ले येथील चर्च रोडवरील ‘शांता भवन’ या बहुमजली इमारतीच्या फ्लॅटमध्ये मंगळवारी रात्री भीषण आग लागली.
विलेपार्लेत अग्नितांडव! मुलासह महिलेचा मृत्यू; सहाजण जखमी
विलेपार्लेत अग्नितांडव! मुलासह महिलेचा मृत्यू; सहाजण जखमीX
Published on

मुंबई : एक हलगर्जीपणा कुटुंबासाठी काळरात्र ठरली. कपड्यांना इस्त्री करून बाहेर पडताना उपकरणाचा वीजपुरवठा बंद करण्यास विसरल्याने विलेपार्ले येथील चर्च रोडवरील ‘शांता भवन’ या बहुमजली इमारतीच्या फ्लॅटमध्ये मंगळवारी रात्री भीषण आग लागली. आगीने वेढलेल्या बाळाला कुशीत घेऊन घरकाम करणाऱ्या महिलेने स्नानगृहात धाव घेतली. मात्र, गुदमरून दोघांचाही मृत्यू झाला. त्या दुर्घटनेत अन्य सहाजण जखमी झाले आहेत. अबीर (वय अडीच वर्षे), अंकिता (२३) अशी मृतांची नावे आहेत.

विलेपार्ले पश्चिम येथे तळ अधिक १२ मजली शांता भवन इमारतीच्या ११ मजल्यावरील रुम नंबर ११०१ / ११०२ मध्ये मंगळवारी रात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. कपडे इस्त्री करत असताना इस्त्री चालू ठेवून मुलाला पाहण्यासाठी महिला दुसऱ्या खोलीत गेली. त्याच वेळी इस्त्रीला आग लागल्याचे सांगण्यात आले. या घटनेत अबीर (अडीच वर्षे) व अंकिता (२३) या दोघांचा दुदैवी मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले असून जखमींना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आग वाऱ्यासारखी पसरली

दरम्यान, इमारतीतील फायर फायटींग सिस्टम बंद असल्याने इमारतीच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात येईल, असे मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख रवींद्र आंबुलगेकर यांनी सांगितले. विलेपार्ले (प)., बाप्टिस्टा रोड, सेंट झेवियर स्कूल जवळ तळ अधिक १२ मजली शांता भवन ही इमारत आहे. या इमारतीमधील ११ व्या मजल्यावर रात्री १० च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. काही वेळात आग वाऱ्यासारखी पसरली आणि इमारतीत धुराचे लोट पसरले. त्यामुळे इमारत आणि परिसरात एकच खळबळ उडाली. या आगीत अडकलेल्या आठ जणांनी स्वतःला वाचविण्यासाठी आरडाओरड सुरु केली होती.

पालिका यंत्रणा, अग्निशमनच्या जवानांचे बचावकार्य

आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, महापालिका यंत्रणा आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर बचावकार्य हाती घेतले. अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्य सुरू असताना रात्री १०.०८ वाजता आगीचे स्वरूप पाहून आग स्तर -१ ची असल्याचे आणि रात्री १०.०८ वाजता आगीचे स्वरूप पाहून सदर आग ही स्तर -२ ची असल्याचे जाहीर केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आठ जणांना सुखरुप बाहेर काढले. या घटनेत जखमी झालेल्यांपैकी नानावटी रुग्णालयात चार व आणखीन दोघांना कूपर रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले होते. नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या सहा जखमींपैकी गंभीर जखमी अबीर ( अडीच वर्षे) याचा आणि अंकिता (२३) या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. उर्वरित चार जखमींपैकी, दोन जखमींवर उपचार सुरू असून दोघांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तसेच, आणखीन दोन जखमींवर कूपर रुग्णालयात उपचार करून त्यांनाही घरी सोडण्यात आले.

दरम्यान, या इमारतीतील ११ व्या मजल्यावरील रुम ११०१ व ११०२ मध्ये आग कशी लागली, याबाबत अग्निशमन दलाचे संबंधित अधिकारी आणि स्थानिक पोलीस हे अधिक तपास करीत आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in