
मुंबई : काही दिवसांपूर्वी दै. ‘नवशक्ति’ वृत्तपत्राने 'विलेपार्ले येथील आयुर्वेदिक दवाखाना उद्घाटनाच्या प्रतीक्षेत' या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल मुंबई महापालिका प्रशासनाने घेतली. येत्या दोन आठवड्यांत स्थलांतरणाची प्रक्रिया पूर्ण करून हा दवाखाना कार्यान्वित होईल, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य पायाभूत सुविधा कक्षामार्फत विलेपार्ले येथील आयुर्वेदिक दवाखाना इमारत उभारण्यात आली आहे. ही इमारत सार्वजनिक आरोग्य खाते, ‘के पूर्व’ विभाग यांना २६ जून २०२५ रोजी हस्तांतरित करण्यात आली असून लवकरच कार्यान्वित होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.