विरार येथे इमारतीचा भाग कोसळला; तिघांचा मृत्यू; ९ जण जखमी

विरारच्या नारंगी नगर रोड, विजय नगर परिसरातील रमाबाई अपार्टमेंट चार मजली इमारतीच्या चौथ्या मजल्याचा एक भाग कोसळला आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाले आहेत.
विरार येथे इमारतीचा भाग कोसळला; तिघांचा मृत्यू; ९ जण जखमी
Published on

विरार : विरारच्या नारंगी नगर रोड, विजय नगर परिसरातील रमाबाई अपार्टमेंट चार मजली इमारतीच्या चौथ्या मजल्याचा एक भाग कोसळला आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाले आहेत. तसेच ढिगारा उपसण्याचे काम सुरू असून काही जण त्यात अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.

मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास रमाबाई अपार्टमेंट या ४ मजली इमारतीचा मागील चौथ्या मजल्याचा एक भाग कोसळला. ही इमारत दहा वर्ष जुनी असून महापालिकेने स्ट्रक्चरल ऑडिट' करण्याची नोटीस दिली होती.

मात्र या दुर्घटनेत तीन जणांच्या मृत्यूची माहिती समोर आली आहे. तर वसईचे आमदार स्नेहा दुबे-पंडीत यांच्या म्हणण्यानुसार इमारतीत २० ते २५ जण अद्याप अडकल्याची शक्यता वर्तवली आहे.

सध्या घटनास्थळी एनडीआरएफ पथक आणि वसई विरार शहर महापालिकेच्या अग्निशमन दलाची टिम बचाव व मदतीचे काम करत आहे. आतापर्यंत ९ जणांना वाचवून त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर मलब्यात अडकलेल्या नागरिकांना शोधण्यासाठी श्वान पथकाची मदत घेतली जात आहे.

दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या आजूबाजूला दाटीवाटीने चाळी-इमारती असल्याने यंत्र सामग्री पोहचत नाही. इमारतीचा राडारोडा बाहेर काढावा लागणार आहे.

चिमुकलीवर वाढदिवशी काळाचा घाला

या इमारतीत राहणाऱ्या जोयल कुटुंबातील एका चिमुरडीचा पहिला वाढदिवस होता. त्यानिमित्त त्यांच्या घरी पाहुणेमंडळी आले होते. या दुर्घटनेत ज्या चिमुरडीचा वाढदिवस होता तिचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तिच्या आईचा ही दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. तर वडील तर ओमकार जोयल हे अद्याप सापडले नाहीत. याच इमारतीतील चौथ्या मजल्यावर राहणारे सचिन निवळकर, सुप्रिया निवळकर, मुलगा अर्णव निवळकर हे सुद्धा सापडलेले नसल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान या दुर्घटनेनंतर इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या जुन्या अपघातानंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

logo
marathi.freepressjournal.in