विरारच्या आई जीवदानी मंदिराची सुरक्षा CCTV च्या नजरेत

पालघर जिल्ह्यातील विरार येथील प्रसिद्ध जीवदानी माता मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवात भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने यंदा मंदिर परिसरात १६० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सुरक्षा व्यवस्था करण्यात येणार आहे.
विरारच्या आई जीवदानी मंदिराची सुरक्षा CCTV च्या नजरेत
Published on

अनिलराज रोकडे/वसई

पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध विरारच्या आई जीवदानी माता मंदिर श्रद्धेचे केंद्र मानले जाते. वर्षभर येथे धार्मिक सण आणि उत्सव साजरे केले जातात. विशेषतः शारदीय नवरात्रोत्सवात जीवदानी गडावर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्या पार्श्वभूमीवर यंदा मंदिर परिसरात १६० सीसीटीव्हीच्या माध्यमातून सुरक्षा केली जाणार असल्याची माहिती मंदिर प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाने दिली आहे.

तसेच गर्दीच्या वेळेस कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्तही तैनात केला जाणार आहे. बुधवारी अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्ता शिंदे यांनी बंदोबस्ताचा आढावा घेतला.

मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप तेंडोलकर आणि उपाध्यक्ष पंकज ठाकूर यांनी यावेळी सांगितले की, नवरात्रोत्सवात भाविकांची मोठी गर्दी होणार आहे, त्यामुळे वाहतुकीच्या मार्गातही बदल करण्यात येणार आहेत.

मुंबई आणि ठाणे महानगरांसह राज्याच्या विविध भागांहून भाविक दर्शनासाठी येतात. यामध्ये गुजरात, ठाणे, पालघर, भाईंदर, मुंबई, राजस्थान, कोकण इत्यादी ठिकाणांचा समावेश आहे. मंदिर सुरक्षेचा आढावा एटीएसने देखील घेतला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ठिकठिकाणी सुरक्षा कवच उभारण्यात आले असून, नऊ दिवस चालणाऱ्या नवरात्रोत्सवात पोलिसांच्या जोडीला विवा महाविद्यालयाचे २०० NCC विद्यार्थी तैनात राहणार आहेत. त्यांना मदत करण्यासाठी मंदिर ट्रस्टकडून १०० गार्ड नियुक्त केले गेले आहेत. तसेच मंदिर आणि परिसरात हत्यारबंद पोलिसही तैनात असणार आहेत.

नवरात्रोत्सवात श्री जीवदानी मातेला महाभिषेक, वस्त्रालंकार, शृंगार आणि नवचंडी वाचन करण्यात येणार आहे. तसेच दर दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातील.

महाप्रसादाचे वाटप

जीवदानी मंदिरात दर्शनासाठी वापरण्यात येणाऱ्या फेनिक्युलरची चाचणी यशस्वी झाली असून, भाविकांसाठी नवरात्रीत महाप्रसादाचे विनामूल्य वाटप करण्यात येणार आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी अंदाजे ५० हजार भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे, तर रविवारी हा आकडा लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in