
विरारमधील विवा कॉलेजमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. रिचा पाटील (वय १९), बी.कॉम. प्रथम वर्षाची विद्यार्थिनी, हिने १३ ऑक्टोबरच्या रात्री मनवेलपाडा, विरार (पूर्व) येथील राहत्या घराच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पोलीस तपासानुसार, रिचाला तिच्याच कॉलेजमधील काही तरुणांकडून छळ, अपमान आणि धमक्यांना सामोरे जावे लागत होते. यात तिचा कथित प्रियकर आणि त्याचा मित्रही सामील होता. त्याच दिवशी या दोघांनी विवा कॉलेजच्या आवारातच तिच्या वडिलांचा अपमान करीत त्यांना मारहाणही केली होती.
विरार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिचाला काही आठवड्यांपासून कॉलेजमधील काही तरुण सातत्याने त्रास देत होते. तिचे वडील सचिन विठ्ठल पाटील (वय ४५), शिव शंभो अपार्टमेंट, नाना-नानी पार्क येथील रहिवासी, यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी विद्यार्थ्यांनी रिचाचे फोटो मॉर्फ करून ते व्हायरल करण्याची धमकी दिली होती, ज्यामुळे ती प्रचंड मानसिक तणावाखाली होती.
रिचाने बोलण्यास नकार दिल्यामुळे मारहाण
माहितीनुसार, रिचाची ओळख कॉलेजमधील शिवा नावाच्या विद्यार्थ्याशी झाली होती. शिवाला तिच्याबद्दल एकतर्फी आकर्षण होते, पण दोघांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होते. शनिवारी शिवा आणि त्याचा मित्र (जो भायंदर येथील अभिनव कॉलेजचा विद्यार्थी आहे) यांनी कॉलेजच्या बाहेर रिचाला अडवले. तिने त्यांच्याशी बोलण्यास नकार देताच, शिवाने तिच्या कानशिलात लगावली. प्रत्युत्तरात रिचाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवाच्या मित्राला थप्पड मारली आणि घरी जाऊन वडिलांना संपूर्ण प्रकार सांगितला.
प्राचार्यांचा हस्तक्षेपास नकार, म्हणाले - “पोलीस ठाण्यात जा”
सोमवारी रिचा आणि तिचे वडील विवा कॉलेजमध्ये प्राचार्यांकडे तक्रार देण्यासाठी गेले. मात्र, प्राचार्य तेव्हा उपस्थित नव्हते. त्याचवेळी शिवा आणि त्याचा मित्र कॉलेजमध्ये आले. रिचाच्या वडिलांनी त्यांना जाब विचारल्यावर, शिवाने रिचाबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले. संतापून वडिलांनी त्याच्या कानाखाली मारली. त्यानंतर वाद वाढला आणि विद्यार्थ्यांची गर्दी जमली. थोड्यावेळाने प्राचार्य आले, पण त्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आणि “पोलीस ठाण्यात जा” असा सल्ला दिला.
वडिलांचा अपमान, मारहाणही केली
रिचा आणि तिचे वडील कॉलेजच्या बाहेर पडताच आरोपींनी पुन्हा तिचे फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे संतापलेल्या वडिलांनी पुन्हा शिवाला कानाखाली लगावली. त्यावर शिवाच्या मित्राने तिच्या वडिलांवर हल्ला केला. या घटनेमुळे रिचा प्रचंड हादरली आणि खचली.
शेवटची रात्र
घरी परतल्यानंतर रिचा खूप अस्वस्थ आणि निराश होती. रात्री साधारण १:१५ वाजता तिने आपल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. प्रथम तिला विरार येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र स्थिती गंभीर असल्याने तिला वसई (पश्चिम) येथील कार्डिनल ग्रेसियस रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी कलम ३५२, ३५१(२) आणि ११५(२) अंतर्गत शिवा, अमित, नितीन आणि अजून एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रिचाच्या पालकांनी पूर्वीच कॉलेज प्रशासनाकडे या छळाबाबत तक्रार केली होती, पण त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. एकदा तर प्राचार्यांनी तिच्या आईचा सर्वांसमोर अपमान केल्याचा आरोप आहे. कॉलेज प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आणि दुर्लक्षामुळेच रिचा अधिक खचली होती असा आरोप कुटुंबाने केला आहे.
स्थानिक आणि विद्यार्थ्यांमध्ये संताप
या घटनेनंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट पसरली असून स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची आणि विवा कॉलेज प्रशासनाला जबाबदार धरण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा शैक्षणिक संस्थांमधील छळ, मानसिक अत्याचार आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्षाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.