मलबार हिलवासीयांचा मंत्र्यांविरुद्ध ‘आवाज’; मंत्र्यांच्या बंगल्याबाहेरील रहदारी, आवाजाबाबत स्वाक्षरी मोहीम

मलबार हिलवरील मंत्र्यांच्या बंगल्याच्या आसपासच्या इमारतींमधील रहिवाशांनी एक अनोखी मोहीम सुरू केली आहे.
मलबार हिलवासीयांचा मंत्र्यांविरुद्ध ‘आवाज’; मंत्र्यांच्या बंगल्याबाहेरील रहदारी, आवाजाबाबत स्वाक्षरी मोहीम
FPJ
Published on

मुंबई : शहरातील उच्चभ्रूंच्या परिसरातील फेरफटका कुणाला आवडणार नाही. कधी अँटेलिया तर राजभवन. कधी मंत्र्यांचे बंगले तर कधी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान. दक्षिण मुंबईतील मलबार हिलसारखा परिसर असाच सेल्फी पाॅइंट आहे. मात्र अशाच भागातील रहदारी आणि मंत्र्यांच्या निवासस्थानामुळे होणारे वाहनांचे आवाज यामुळे मूळ रहिवाशी मात्र बेजार झाले आहेत.

मलबार हिलवरील मंत्र्यांच्या बंगल्याच्या आसपासच्या इमारतींमधील रहिवाशांनी एक अनोखी मोहीम सुरू केली आहे. या भागातील रस्त्यावर राजकीय वर्दळीमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाविरुद्ध स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचबरोबर स्वाक्षऱ्यांसह एक याचिकाही दाखल करण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री कार्यालय आणि स्थानिक पोलीस ठाण्यात याबाबत पत्रही रहिवाशांकडून दिले जाणार आहे. याबाबतच्या याचिकेत म्हटले आहे की, परिसरातील गर्दी तसेच मोठ्या प्रमाणातील वाहनांचे ये-जा आणि गोंगाट करणाऱ्या फेरी-मोर्चे यामुळे त्रास होत आहे.

द फ्रेंड्स ऑफ मलबार हिल या रहिवाशांच्या एका संघटनेने १२ इमारतींच्या गृहनिर्माण संघटनेसह या मोहिमेचे नेतृत्व केले आहे. याबाबतच्या पत्रात वर्षा, मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान, सह्याद्री सरकारी गेस्ट हाऊस आणि इतर नंदनवन आणि अग्रदूत हे मंत्र्यांचे इतर दोन बंगले यांचा उल्लेख आहे. ही ठिकाणे रहिवाशांसाठी विशेष चिंतेची बाब बनली असून परवानगीच्या मर्यादेपलीकडे लाऊडस्पीकरचा वापर, मोठ्याने घोषणाबाजी, गाणे आणि भाषणे यामुळे स्थानिक लोक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत, असे पत्रात म्हटले आहे. ‘मलबार हिल या रहिवासी परिसरात ज्येष्ठ, आजारी आणि लहान मुलेही राहतात. शांत आणि सुरक्षित वातावरण हा मूलभूत अधिकार आहे’, असे पत्रात म्हटले आहे. फ्रेंड्स ऑफ मलबार हिलचे सदस्य परविन संघवी म्हणाले की, त्यांनी फेब्रुवारी २०२३ मध्ये मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली होती. परंतु या समस्येचे निराकरण झाले नाही. हा एक निवासी परिसर असून गेल्या काही दिवसांपासून समर्थक एकत्र येत आहेत, असेही सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in