मतदार ओळखपत्र आधार कार्डशी संलग्न होणार; निवडणूक आयोगाचा निर्णय

राज्‍यातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशीदेखील याबाबत चर्चा करण्यात येणार
मतदार ओळखपत्र आधार कार्डशी संलग्न होणार; निवडणूक आयोगाचा निर्णय

आता मतदार ओळखपत्र आधार कार्डशी संलग्न होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. महाराष्‍ट्रात मतदार कार्ड आधारशी संलग्‍न करण्याची मोहीम येत्‍या १ ऑगस्‍टपासून सुरू होणार असल्‍याची माहिती राज्‍याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. आधारशी मतदार कार्ड संलग्‍न करण्याची सक्‍ती नसली तरी इतर पासपोर्ट आदी ११ पर्यायी कागदपत्रे द्यावीच लागणार असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले. ऑगस्‍ट २०२२ ते एप्रिल २०२३पर्यंत ही मोहीम चालणार आहे.

राज्‍यातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशीदेखील याबाबत चर्चा करण्यात येणार असल्‍याचेही देशपांडे यांनी सांगितले. मतदार याद्यांचे प्रमाणीकरण, दुबार नावे वगळणे यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार कार्ड आधारशी संलग्‍न करण्याचा निर्णय घेतला आहे. ही मोहीम राज्‍यभर येत्‍या १ ऑगस्‍टपासून पुढील नऊ महिने राबविण्यात येणार आहे. आधारशी मतदार कार्ड संलग्‍न करण्यासाठी अर्ज क्रमांक ‘६ ब’ भरावा लागणार आहे. भारत निवडणूक आयोगाचे संकेतस्‍थळ, राज्‍य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे संकेतस्‍थळ, नॅशनल व्होटर सर्व्हिस पोर्टल, व्होटर हेल्‍पलाइन ॲप या ठिकाणी हा फॉर्म ऑनलाइनही भरता येणार आहे. तसेच करणे शक्‍य न झाल्‍यास आधार कार्डाची साक्षांकित प्रतही मतदाराला प्रत्‍यक्ष सादर करता येईल. घरोघरी जाऊनदेखील हा फॉर्म भरून घेण्यात येईल. निवडणूक कार्यालयांकडून त्‍यासाठी राज्‍यव्यापी विशेष शिबिरेही आयोजित करण्यात येणार असल्‍याचे श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले. मतदार कार्ड आधारशी संलग्‍न केल्‍यामुळे मतदाराच्या ओळखीचे प्रमाणीकरण, एकापेक्षा अधिक नोंदीची वगळणी तर शक्‍य होणार आहेच; पण निवडणूक तसेच मतदानासंबंधी माहिती व आयोगाकडून प्रसारित होणाऱ्या सूचना मतदाराला त्‍याच्या फोनपर्यंत थेट पाठविता येणार आहेत; मात्र आधार संलग्‍न करणे हे बंधनकारक नसून ऐच्छिक आहे. आधारशी संलग्‍न केले नाही म्‍हणून कोणत्‍याही मतदाराचे नाव वगळण्यात येणार नाही. तसेच आधार क्रमांकाची गोपनीयता अबाधित ठेवण्यात येईल. आयोगातील कोणत्‍याही कर्मचाऱ्याने जर ती भंग केली, तर त्‍यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्‍याचेही देशपांडे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in