मुंबई : मुंबईत लोकसभा निवडणुकीत मतदान संथ गतीने झाल्याच्या तक्रारींची दखल घेत आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रांची संख्या वाढविण्याचा उपाय निवडणूक यंत्रणेने अवलंबिला आहे. त्यानुसार मुंबई पालिका क्षेत्रातील एका मतदान केंद्रावर सध्याच्या सरासरी दीड हजार मतदारांएेवजी यापुढे सरासरी १,००० ते १,२०० इतकेच मतदार असतील.
मुंबईचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी शुक्रवारी (१६ आॅगस्ट) आगामी निवडणुकांच्या तयारीबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिंधींसोबत बैठक घेतली. त्या बैठकीत ही माहिती देण्यात आली.
अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव आणि अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबई उपनगरे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी बैठकीत सांगितले की, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दरम्यानचा अनुभव लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मतदान केंद्रांच्या रचनेत अधिक सूसूत्रीकरण करण्यात आले आहे. राजकीय पक्षांनाही नव्या मतदार याद्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. परिणामी, प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी आता मर्यादित मतदार असतील. त्यामुळे मतदान केंद्रांच्या संख्येत वाढ होणार आहे.
याचाच अर्थ मतदानाचे प्रमाण व वेग वाढेल. याआधी मतदान केंद्रात सूसूत्रता आणण्यात आली आहे. सहकारी गृहनिर्माण संस्था वा झोपडपट्टी परिसर लक्षात घेता मतदार संख्या व परिसर यांचा योग्य ताळमेळ करण्यात आला आहे.
मतदार यादी संक्षिप्त पुनरीक्षण उपक्रम सुरू
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सध्या राज्यात दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अर्थात मतदार यादी संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये नवमतदारांना नाव नोंदणीसह विविध सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. मुंबई शहर जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये सदर कार्यक्रमाची प्रशासनाने जनजागृती केली आहे. त्यासोबत, राजकीय पक्षांनीदेखील आपापल्या परीने या कार्यक्रमाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी, जेणेकरुन मतदार नोंदणीचे पर्यायाने मतदानाचे प्रमाण वाढवण्यास मदत होईल, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी गगराणी यांनी केले.
महिनाअखेर अंतिम मतदार यादी जाहीर होणार
सध्या सुरू असलेला मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम दिनांक २० ऑगस्ट २०२४ पर्यंत राबविण्यात येणार आहे. त्यानंतर दिनांक ३० ऑगस्ट २०२४ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. नवमतदारांची नोंदणी, मतदारांच्या नावासमवेत मोबाईल क्रमांक जोडणे इत्यादी प्रक्रियांची माहिती देखील या बैठकीत देण्यात आली. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी त्यावर आपापली मते व सूचना मांडल्या.
"मुंबईत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचतानाच मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी यंत्रणांच्या प्रयत्नांना राजकीय पक्षांनी देखील सहकार्य करण्याची गरज आहे. मतदारांना अधिकाधिक सुलभ पद्धतीने मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी यंत्रणेसोबतच राजकीय पक्षांनीही एकत्रित प्रयत्न करावेत. सध्या मुंबई महानगरात मतदार यादी संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाची पूर्ण क्षमतेने अंमलबजावणी करण्यात यावी, जेणेकरुन अधिकाधिक मतदार नोंदवले जातील."
- भूषण गगराणी, जिल्हा निवडणूक अधिकारी व मुंबई महानगरपालिका आयुक्त.