
मुंबई : वडाळा चर्च येथे सोमवारी पावसाचा धुमाकूळ सुरू असताना दुपारी ३ वाजून १० मिनिटांच्या सुमारास बेस्ट बसच्या धडकेत आई व ८ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
बेस्टच्या खासगी कंत्राटदाराच्या डागा ग्रुपची ही मिडीबस (७२३२) बसमार्ग क्रमांक ए-१७४ वर वीर हुतात्मा भाई कोतवाल उद्यान प्लाझाहून भरणी नाका, वडाळा येथे जात होती. वडाळा चर्च बस स्टॉपजवळ बसचालक बापूराव शिवाजी नागबोने यांचा बसवरील ताबा सुटला व त्यांनी लिओबा सेल्वेराज (३८) या महिला पादचारी आणि व अँथनी सेल्वेराज (८) या तिच्या मुलाला धडक दिली. घटनास्थळी उपस्थित मुलाला तत्काळ पोलिसांनी के.ई.एम. रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टर युसुफ खान यांनी दुपारी ३.४० वाजता त्याला मृत घोषित केले. तर महिलेच्या उजव्या खांद्याला आणि दोन्ही पायांच्या तळव्याला गंभीर दुखापत झाली होती. बस वाहक अनिल साखरे यांनी त्यांना तातडीने सायन रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान सायंकाळी ४.२५ वाजता तिलाही मृत घोषित करण्यात आले. या अपघाताचा पोलीस तपास करत आहेत.