रूग्णवाहिका पुरवठयात घोटाळा झाल्याचा वडेट्टीवार यांचा आरोप; तलाठी भरती घोटाळ्याची एसआयटी चौकशीची मागणी

रूग्णवाहिका पुरवठयात घोटाळा झाल्याचा वडेट्टीवार यांचा आरोप; तलाठी भरती घोटाळ्याची एसआयटी चौकशीची मागणी

परीक्षार्थींच्या भावना लक्षात घेऊन सरकारने तलाठी पद भरती प्रक्रिया रद्द करावी. तसेच संपूर्ण तलाठी पद भरतीची एसआयटीमार्फत चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी येथे केली.

मुंबई : राज्य सरकारने घेतलेल्या तलाठी भरती परीक्षेच्या विरोधात विद्यार्थ्यांचे जोरदार आंदोलन सुरु आहे. परीक्षार्थींच्या भावना लक्षात घेऊन सरकारने तलाठी पद भरती प्रक्रिया रद्द करावी. तसेच संपूर्ण तलाठी पद भरतीची एसआयटीमार्फत चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी येथे केली. याशिवाय राज्यात रुग्णवाहिका घोटाळा उघड झाला असून या रुग्णवाहिका पुरवठ्याची निविदा सरकारने रद्द करावी. या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

तलाठी भरतीच्या पेपरफुटीमुळे संपूर्ण भरती प्रक्रीया रद्द करण्यासाठी राज्यभरात परीक्षार्थींची आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनाला वडेट्टीवार यांनी पाठिंबा जाहीर केला. हे आंदोलन दडपण्यासाठी सरकारने परीक्षार्थींवर गुन्हे दाखल करायला सुरूवात केली असून राज्य सरकारने आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली. यासंदर्भात आपण पुण्यात येत्या २३ जानेवारीला परीक्षार्थींशी संवाद साधणार आहोत.

घोटाळेबाजांवर कारवाई करण्याऐवजी सरकार विद्यार्थ्यांवर कारवाई करत आहे. आंदोलन चिरडण्याची या सरकारची जुलमी वृत्ती आता लपून राहिलेली नाही. या मुलांनी कायदा हातात घेतला नाही. परंतु आमच्या घोटाळ्याविरोधात बोलाल तर गुन्हे दाखल करू, अशी सरकारची दडपशाहीची भूमिका असल्याचा आरोपही त्यांनी केला.

यावेळी वडेट्टीवार यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णवाहिका पुरवठ्यात घोटाळा झाल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार केला. पैसे खाण्याचा नवा धंदा सरकारमधील काही मंडळींनी सुरू केला आहे. सनदी अधिकाऱ्यांना 'बदली'ची भीती दाखवून ही निविदा आठ हजार कोटीपर्यंत फुगवल्याचे उघड झाले आहे. ४ ऑगस्ट २०२३ च्या शासन निर्णयानुसार सरकार १ हजार ५२९ रुग्णवाहिका खरेदी करणार आहे. एका कार्डिएक सुविधा असलेल्या रुग्णवाहिकेची किंमत ५० लाखाच्या आसपास असते. १ हजार ५२९ रुग्णवाहिकांचे ५० लाख याप्रमाणे एकूण ७६४ कोटी ५० लाख रूपये होतात. मात्र, सरकार या कामावर ८हजार कोटी खर्च करणार आहे, असा दावा वडेट्टीवार यांनी केला.

logo
marathi.freepressjournal.in