वाधवान बंधूंची तुरुंगात पंचतारांकित अय्याशी

तुरुंगातून वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली प्रशासकीय संगनमताने अय्याशी होत असल्याचे दिसून येत आहे
वाधवान बंधूंची तुरुंगात पंचतारांकित अय्याशी

मुंबर्इ : दिवान हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशनचे संस्थापक आणि काही वर्षांपूर्वी देशातील १७ बँकांना ३४६१० कोटी रुपयांचा गंडा घातल्यामुळे कपिल आणि धीरज वाधवान बंधू सध्या मुंबर्इजवळील तळोजा येथे तुरुंगवास भोगत आहेत, मात्र त्यांचा हा तुरुंगवास कुणा पंचतारांकित हॉटेलमधील अय्याशीपेक्षा कमी नसल्याचे सत्य इंडिया टुडेच्या पत्रकारांनी उघडे पाडले आहे.

देशातील तब्बल १७ बँकांची ३४६१० कोटींची फसवणूक करण्याच्या प्रकरणात वाधवान बंधू मुख्य आरोपी आहेत. देशातील अनेक तपास यंत्रणा सध्या या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत. यात सीबीआय, ईडी या प्रमुख तपास यंत्रणांचा समावेश आहे. दरम्यान, वाधवान बंधूंना अटक करून मुंबर्इजवळील तळोजास्थित तुरुंगात त्यांना ठेवण्यात आले आहे, मात्र सरकारी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्याच्या नावाखाली हे बंधू वारंवार तुरुंगातून बाहेर पडतात आणि रुग्णालयांच्या पार्किंग परिसरात चक्क व्यावसायिक आणि कौटुंबिक बैठकांचे आयोजन करतात. या बैठकांच्या वेळी त्यांना उंची कॉफी, नाश्ता व अन्य सुविधा दिल्या जातात. इंडिया टुडेने ७ ऑगस्ट रोजी झालेल्या अशाच एका बैठकीचे पुरावे सादर केले आहेत. त्या दिवशी कपिल वाधवान मुंबर्इतील केर्इएम हॉस्पिटलमध्ये जाण्यास निघाले. अर्थातच वैद्यकीय तपासणीसाठी. नंतर ते हॉस्पिटलच्या पार्किंग लॉटमध्ये आपल्या कुटुंबीयांना व अन्य संबंधितांच्या भेटी घेताना दिसले. त्यावेळी त्यांना खासगी गाडी देखील उपलब्ध होती. दोन दिवसांनंतरच धीरज वाधवान देखील अशाच प्रकारे बाहेर पडून अशीच वैद्यकीय तपासणी करताना आढळले, मात्र ते जे. जे. हॉस्पिटलला गेले होते. त्यांच्या या भेटीदरम्यान पोलीस पहारा देखील असतो. जुलै महिन्यात धीरज वाधवान यांना विशेष न्यायालयाने वैद्यकीय जामीन नाकारला होता, मात्र त्यांना खासगी रुग्णालयात हृदयावरील उपचार घेण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यापूर्वी २०२० साली कोरोना साथ असताना वाधवान बंधू लॉकडाऊन नियम मोडून तब्बल २० जणांसोबत महाबळेश्वरला गेले होते. गुन्हेगाराने तुरुंगात खडतर जीवन भोगून आपल्या शिक्षेचे प्रायश्चित्त घेणे अपेक्षित असते. येथे मात्र तुरुंगातून वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली प्रशासकीय संगनमताने अय्याशी होत असल्याचे दिसून येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in