दुर्मिळ जनुकीय आजाराने ग्रस्त बालकावर यशस्वी उपचार; परळच्या वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांचे यश

परळ येथील बाई जेरबाई वाडिया बाल रुग्णालयाच्या डॉक्टरांनी ‘कॅन्ट्रल्स पेंटालॉजी’ या हृदय, छाती आणि पोटाच्या अस्तराशी संबंधित अत्यंत दुर्मिळ जनुकीय आजाराने ग्रस्त असलेल्या एका नवजात कन्येवर यशस्वी उपचार केले.
दुर्मिळ जनुकीय आजाराने ग्रस्त बालकावर यशस्वी उपचार; परळच्या वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांचे यश
Published on: 

मुंबई : परळ येथील बाई जेरबाई वाडिया बाल रुग्णालयाच्या डॉक्टरांनी ‘कॅन्ट्रल्स पेंटालॉजी’ या हृदय, छाती आणि पोटाच्या अस्तराशी संबंधित अत्यंत दुर्मिळ जनुकीय आजाराने ग्रस्त असलेल्या एका नवजात कन्येवर यशस्वी उपचार केले.

गर्भावस्थेतच या आजाराचे निदान झाल्यानंतर या बालकावर अत्यंत क्लिष्ट अशी पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया करण्यात आली आणि प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर २० व्या दिवशी तिला सुखरूप घरी सोडण्यात आले.

'कॅन्ट्रल्स पेंटालॉजी' ही एक अतिशय दुर्मिळ जन्मजात स्थिती असून, यामध्ये पोटाची भिंत, छातीचे हाड, डायफ्रॅम, हृदयाचे संरक्षक आवरण आणि स्वतः हृदय या पाच महत्त्वाच्या भागांच्या विकासात दोष निर्माण होतात.

याच्या तीव्र स्वरूपात हृदय आणि पोटातील अवयव त्यांच्या नेहमीच्या जागेऐवजी शरीराबाहेर विकसित होऊ शकतात. वैद्यकीय अंदाजानुसार, दर ६५,००० ते २,००,००० जिवंत जन्मांमागे एका बालकाला हा आजार होतो, असा अंदाज आहे.

बालरोग सर्जन डॉ. प्रज्ञा बेंद्रे, डॉ. गायत्री मुणगेटे आणि डॉ. अभिषेक माथुर यांच्यासह कार्डिओथोरॅसिक सर्जन डॉ. बिस्वा पांडा यांनी ही शस्त्रक्रिया पार पाडली.

नवजात शिशु काळजी पथकाचे नेतृत्व डॉ. सुमा यांनी केले, तर रेडिओलॉजिस्ट डॉ. सरोज चव्हाण यांनी शस्त्रक्रियेत सहाय्य केले, अशी माहिती देण्यात आली.

बालकाची झालेली सुटका हे सुनियोजित सांघिक कार्य, काटेकोर नियोजन आणि बहुविद्याशाखीय पथकाच्या कटिबद्धतेचे प्रतीक आहे. आजाराची दुर्मिळता किंवा क्लिष्टता कितीही असली, तरी गंभीर आजारी मुलांना प्रगत बालरोग उपचार पुरवण्यासाठी रुग्णालय नेहमीच कटिबद्ध आहे.

डॉ. मिनी बोधनवाला, सीईओ, बाई जेरबाई वाडिया बाल रुग्णालय

हृदय, यकृत, आतड्यांवर उपचार

इमेजिंगचा अभ्यास करून आणि शस्त्रक्रियेच्या धोरणाची पूर्वतयारी करून एका बहुविद्याशाखीय पथकाने शस्त्रक्रियेची आखणी केली. शस्त्रक्रियेदरम्यान, सर्जननी शरीराबाहेर आलेले हृदय, यकृत आणि आतड्यांचे भाग आजूबाजूच्या आवरणापासून अत्यंत काळजीपूर्वक वेगळे केले. बालकाच्या स्वतःच्या पेरीकार्डियल ऊतींचा वापर करून हृदयाचे संरक्षक आवरण पुन्हा तयार करण्यात आले आणि आवश्यक तिथे कृत्रिम जाळीचा आधार घेण्यात आला. त्यानंतर सर्व अवयव त्यांच्या योग्य जागी बसवण्यात आले आणि डायफ्रॅम व पोटाची भिंत पुनर्निर्मित करण्यात आली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in