एनसीबीच्या ज्ञानेश्वर सिंह यांनी छळ केल्याची वानखेडेंची तक्रार

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केल्यानंतर वानखेडे यांच्यावर सौदेबाजी केल्याचे आरोप करण्यात आले होते
एनसीबीच्या ज्ञानेश्वर सिंह यांनी छळ केल्याची वानखेडेंची तक्रार

मुंबई एनसीबीचे माजी प्रमुख समीर वानखेडे यांनी एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांच्याविरोधात छळ केल्याची तक्रार ‘राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगा’कडे दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल केली आहे. कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केल्यानंतर वानखेडे यांच्यावर सौदेबाजी केल्याचे आरोप करण्यात आले होते.

ड्रग्ज प्रकरणात ज्ञानेश्वर सिंह यांनी ७-८ अधिकाऱ्यांवर अनियमितता केल्याचा आरोप केला होता. यादरम्यान समीर वानखेडे यांच्यावरही आरोप करण्यात आले. आर्यनला ड्रग्ज प्रकरणात सोडण्यासाठी वानखेडे यांनी २५ कोटी रुपयांचा सौदा केल्याचा त्यांचा दावा आहे. ‘दोन महिन्यांपूर्वी आपल्याविरुद्ध सुरू असलेला तपास थांबवण्यासाठी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे ५० पानी अर्ज आपण पाठवला होता. त्यावर चौकशी केल्यानंतर आता त्यांच्याविरुद्ध सुरू असलेला तपास थांबवावा, असे आदेश आले आहेत’, असे नमूद करून वानखेडे म्हणाले की, ‘तपास करण्याच्या नावाखाली तपास अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची खिल्ली उडवली होती.’

‘तपासाच्या नावाखाली त्यांनी (ज्ञानेश्वर) जाणूनबुजून माझे तपशील, माझ्या पत्नीचे वैयक्तिक तपशील, त्यांचे बँक तपशील आणि तपासाचे मुद्दे मीडियात लीक केले. हे फक्त माझा अपमान करण्यासाठी आणि त्रास देण्यासाठी केले गेले. हे सर्व लीक केल्यानंतर आम्हाला समाजात खूप त्रास सहन करावा लागला’, असेही वानखेडे यांनी सांगितले.

तपासाच्या नावाखाली छळ

‘तपास अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी एका दलित कुटुंबावर (वानखेडेंचे कुटुंब) खूप अत्याचार केले. मी आयोगाला सर्व पुरावे दिले असून, एससी/एसटी अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सप्टेंबरमध्ये मी ही तक्रार केली होती’, असे वानखेडे यांनी सांगितले.

आयोगाकडून चौकशीचे आदेश

वानखेडे यांच्या तक्रारीवर चौकशी करण्याचे आदेश राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने (एनसीएससी) दिले आहेत. तसेच हे प्रकरण आयोगासमोर प्रलंबित असेपर्यंत वानखेडे यांच्या प्रकरणात कोणतीही पुढील कारवाई करण्यात येऊ नये, असे आदेशही आयोगाने दिले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in