कोर्टाच्या बेलिफला मारहाणप्रकणी वॉण्टेड आरोपीस अटक

स्थानिक न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे
कोर्टाच्या बेलिफला मारहाणप्रकणी वॉण्टेड आरोपीस अटक

मुंबई - कोर्टाच्या बेलिफला शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केल्याप्रकरणी युनूस नूर आलम खान या वॉण्टेड आरोपीस कुरार पोलिसांनी अटक केली. गुन्हा दाखल होताच युनूस हा गेल्या एक वर्षांपासून फरार होता, अखेर एक वर्षांनी त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यांत सालिहा नूर आलम खान ही महिला फरार असून तिच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. वांद्रे शासकीय वसाहतीत राहणारे अझीम खान हे लुघवाद कोर्टात बेलिफ म्हणून काम करतात. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यांत ते नूर आलम अख्लाक खान या व्यक्तीला समन्स बजाविण्यासाठी त्याच्या मालाड येथील पठाणवाडी, हुमेरा पार्कमधील राहत्या घरी गेले होते. यावेळी त्यांना सालिहा खान या महिलेने पुन्हा समन्स बजाविण्यासाठी तिथे येऊ नकोस, नाहीतर परिणाम वाईट होतील अशी धमकी दिली. त्यामुळे ते तेथून निघून गेले. काही वेळानंतर त्यांना युनूस खान भेटला. समन्स बजाविण्यासाठी आले म्हणून त्याने त्यांना शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली होती. त्यात ते जखमी झाले होते. त्यानंतर त्यांनी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली होती. या माहितीनंतर कुरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या आझीम खान यांच्या प्राथमिक औषधोपचार केल्यानंतर त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी युनूस खान आणि सालिहा खान यांच्याविरुद्ध शिवीगाळ करुन धमकी देऊन मारहाण करणे आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम सुरु करण्याचे आदेश दिले होते. मात्र या घटनेनंतर युनूस आणि सालिहा हे दोघेही पळून गेले होते. त्यांचा शोध सुरु असताना युनूसला पोलिसांनी एक वर्षांनंतर अटक केली. पोलीस कोठडीनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत सालिहाला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून तिचा आता पोलिसाकडून शोध सुरु आहे.

logo
marathi.freepressjournal.in