मुंबई : मुंबई आणि महानगर प्रदेशात लोकलशिवाय सार्वजनिक प्रवास हा विचारच अशक्य आहे. आपल्या सर्वांच्या रोजचा प्रवासाचा पहिला थांबा म्हणजे रेल्वे स्थानक. मुंबईतील बहुतांशी रेल्वे स्थानकांनी आपल्या आयुष्याची पन्नाशी ओलांडली आहेत. काहींनी शंभरी पार केली. दिवसागणिक प्रवासी वाढले. तुलनेने सुविधा मात्र वाढल्या नाहीत. सीएसएमटी परिसरात वारांगना, फेरीवाल्यांचा, भिकारी, गर्दुल्ले यांचा सुळसुळाट झाला असून, यामुळे येथून नेहमी प्रवास करणारे प्रवासी त्रस्त झाले आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत.
युनेस्कोने २०२४ साली जागतिक वारसा म्हणून घोषित केलेल्या पूर्वीचे व्हीटी स्टेशन व आत्ताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या इमारतीच्या आसपास वारांगना, अनधिकृत फेरीवाले यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रेल्वे स्थानक हद्दीत १५० मीटर अंतरापर्यंत फेरीवाल्यांना प्रवेश न देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तरीही त्याचे सर्रास उल्लंघन होताना दिसून येते. सुरूवातीला महापालिका, रेल्वे प्रशासनाने कठोर कारवाई करत रेल्वे स्थानकांपासून १५० मीटर अंतरावर पालिकेतर्फे पांढऱ्या रेघा मारून हद्द ठरवण्यात आली होती. परंतु कालांतराने आता या हद्दीच्या रेघा पुसट झाल्या असून, कारवाईचा जोरही मंदावला आहे. नेमका याचाच फायदा घेत फेरीवाल्यांनी रेल्वे परिसरात पुन्हा घुसघोरी केली असून, बिनदिक्कत विक्री सुरू केली आहे. साप्ताहिक सुट्टी आणि बँक हॉलिडेच्या दिवशी तर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत फेरीवाले स्थानक परिसरात आढळून येतात. तसेच स्टेशन परिसरात मोबाईल चोरांचा सुळसुळाट झाला असून, यावर पोलीस यंत्रणा काहीच हालचाली करत नसल्याचे दिसन आले आहे.
२०२४ साली युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केलेल्या या ईमारत परिसरातील आजची अवस्था पहिली तर परदेशी पर्यटक खंत व्यक्त करत आहेत. ४० ते ५० लाख प्रवासी या ठिकाणी रोज ये-जा करतात. देशातील सर्वात जास्त वर्दळीच्या स्टेशनमध्ये या स्टेशनचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. कोणताही सण असला की, परिसरात मोठी गर्दी असते. परदेशी पर्यटक व भारतीय पर्यटक या ठिकाणी फोटो काढण्यासाठी मोठी गर्दी करत असतात. जवळच मुंबई महापालिकेची भव्य दिव्य दगडी बांधकाम केलेली इमारत आहे. दगडी बांधकाम केलेल्या विविध इमारती, पोस्ट ऑफिसचे मुख्य कार्यालय असलेली इमारत, इंग्रज काळातील सेंट जॉर्ज रुग्णालय, कामा हॉस्पिटल, न्यायालय अशी इंग्रज काळातील भव्य दिव्य आकर्षक दगडी बांधकाम असणाऱ्या वास्तू या परिसरात आहेत; मात्र या सर्व परिसराला अवकळा पसरली आहे.
दरम्यान, पालिका अधिकारी, रेल्वे प्रशासन, पोलीस यंत्रणा, इतर संबंधित यंत्रणा ही अवकळा पाहून कधीकधी थातुर-मातुर कारवाई करत असतात. कायमस्वरूपी कारवाई केली तर काही मनमानी कर्तव्य पार पाडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वरकमाईवर गंडांतर येईल. त्यामुळे कायमस्वरूपी कारवाई होत नसावी, असे बऱ्याच प्रवाशांनी बोलून दाखवले.
फलाटावरील शौचालयात जीवघेणी दुर्गंधी
तसेच फलाटावरील मुतारीमधील जीवघेण्या दुर्गंधीमुळे नाक धरून रेल्वेची वाट पाहत असणारे प्रवासी, अशुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय यामुळे मुंबईला भेट द्यायला येणारे पर्यटक त्रस्त झाले आहेत. होमगार्ड, पोलीस, रेल्वे सुरक्षा बल असताना बंद अवस्थेत असलेल्या मेटल डिटेक्टरमुळे प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर सोडलेली आहे.