मुंबई : टेम्पोच्या धडकेत शीव रुग्णालयातील एका २० वर्षांच्या वॉर्डबॉयचा मृत्यू झाला. सुमित संतोष यादव असे या मृत तरुणाचे नाव असून, अपघातानंतर आरोपी टेम्पोचालक घटनस्थळाहून पळून गेला आहे. त्याच्याविरुद्ध कांजूरमार्ग पोलिसांनी हलगर्जीपणाने टेम्पो चालवून एका तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.
रोशन संतोष यादव हा भांडुपच्या टाटानगरचा रहिवाशी आहे. मृत सुमित हा त्याचा लहान भाऊ असून, तो शीव रुग्णालयात वॉर्डबॉय म्हणून कामाला होता. बुधवारी दुपारी तीन वाजता सुमीत हा त्याचा मित्र रितेश प्रल्हाद इंगले, तर रोशन हा त्याचा मित्र यशसोबत दोन बाईकवरुन राहत्या घरातून कांजूरमार्गच्या दिशेने जात होते.
ही वीर सावरकर मार्ग, दातार कॉलनी, आदर्श विद्यालयासमोर येताच एका भरवेगात जाणाऱ्या टेम्पोने सुमीतच्या बाईकला जोरात धडक दिली. टेम्पोचा चाक डोक्यावरून गेल्याने सुमितला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांनी त्याला शीव रुग्णालयात दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.